डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताविरुध्द 95 लाखांचे जप्त वॉरंट

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी यांच्याविरुध्द दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर शिंदे यांनी 94 लाख 71 हजार 219 रुपये 36 पैसे एवढ्या मोठ्या रक्कमेचे जप्ती वॉरंट जारी केले आहे. 35 वर्षानंतर हा निकाल आलेला आहे.

नांदेड येथील रहिवासी नागेश उर्फ सतिश नागोराव कुलकर्णी (पांडे) यांची एक हेक्टर जमीन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासाठी 35 वर्षांपूर्वी अधिगृहीत करण्यात आली होती. त्यावेळी नागेश पांडे हे प्रकल्पग्रस्त होते. त्यांना शासकीय रुग्णालयात प्रकल्पग्रस्त या सदरात शासकीय नोकरी सुध्दा देण्यात आली होती. सोबतच त्यांच्या एक हेक्टर जमीनीच्या अधिग्रहणा संदर्भाने त्यांचे मुख्तार आम दिगंबर यांनी राज्य शासनाविरुध्द अधिगृहीत केलेल्या एक हेक्टर जमीनीचे पैसे मिळविण्यासाठी न्यायालयात वाद दाखल केला होता. या वादाचा न्यायालयीन प्रवास 35 वर्षाच्या झाल्यानंतर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर शिंदे यांच्या स्वाक्षरीने दरखास्त क्रमांक 200321/1997 मध्ये न्यायालयाने 14 मार्च 2022 रोजी अधिष्ठाता डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी यांच्या विरोधात 94 लाख 81 हजार 219 रुपये 36 पैसे वसुल करण्यासाठी जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी म्हणून वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटवर अधिष्ठाता दालन येथील लघुलेखकाने 23 मार्च 2022 रोजी माहिती मिळाली असे लिहुन स्वाक्षरी केली आहे. तसेच वादी नागेश उर्फ सतिश नागोराव कुलकर्णी (पांडे) यांनाही या वॉरंटची माहिती 23 मार्च रोजी प्राप्त झाली आहे. अधिष्ठाता दालनातील स्वीय सहाय्यक सतिश पवार यांनी हे वॉरंट मिळाल्याबद्दल स्वाक्षरी केलेली आहे.

दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिल 2022 रोजी निश्चित करण्यात आलेली आहे.

या 35 वर्षाच्या लढाईनंतर नागेश उर्फ सतिश पांडे यांना जवळपास 1 कोटी रुपये मिळणार हे या आदेशावरुन स्पष्ट झाले आहे. पण ते कधी या बद्दल आजही कांही एक निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण न्यायालयीन प्रक्रियेचा प्रवास अत्यंत कासवगतीने चालत असतो हे तेवढेच सत्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *