नांदेड(प्रतिनिधी)-दि.27 नोव्हेंबर 2012 रोजी वाहतूक शाखेचे सिग्नल तोडून पोलीस अंमलदाराचा शर्ट पकडून धक्काबुक्की करणाऱ्या युवकास अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 25 हजार हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.27 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास तरोडा नाका येथे बापूराव काशिराम चव्हाण हे शहर वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार ड्युटीवर असतांना महसुल कॉलनी येथील सुनिल निवृत्ती वाघमारे (24) हा युवक सिग्नल तोडून पुढे आला. यावेळी पोलीस अंमलदार चव्हाण यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता सुनिल निवृत्ती वाघमारेने त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. याबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 157/2012 दाखल करण्यात आला. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 353, 504 जोडण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सरोदे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात हा खटला क्रमांक 203 क्रमांकाने चालला. त्यात उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसान न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सुनिल निवृत्त वाघमारेला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 25 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.आशिष गोदमगावकर यांनी मानली. भाग्यनगरचे पोलीस अंमलदार सादीक पटेल यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले. या खटल्यात आरोपीच्यावतीने ऍड.मनीष शर्मा (खांडील) यांनी आपली जबाबदारी पुर्ण केली.
सुनिल निवृत्ती वाघमारे हे नांदेड येथील अत्यंत गुणवंत, नामवंत, प्रख्यात, प्रकांडपंडीत ऍड.मनिष शर्मा (खांडील) यांच्या गाडीचे चालक आहेत. आणि त्याच ताकतीवर सुनिल वाघमारेने वाहतुक पोलीसाची कॉलर पकडली असावी असे सांगितले जात आहे.