नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जागी म्हणजे एकूण शहरात 18 जागी पोलीस कायम फिक्स पॉईंट लावल्यानंतर सुध्दा आज संजय बियाणींचा खून झाला. हे फिक्स पॉईंट लावल्यामुळे पोलीस ठाण्याच्या कामकाजात सुध्दा अनंत अडचणी तयार झाल्या आहेत. नांदेड जिल्हा पोलीसांनी मागील दोन वर्षात अनेक गुन्हेगार गजाआड केले असले तरी कांही सुर्याजी पिसाळ वृत्तीच्या लोकांमुळे पोलीसांचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला नाही असे आजची घटना सांगते.
मागील एका आठवड्यापासून शहरातील नांदेड ग्रामीण, इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर आणि विमानतळ अशा 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार वेगवेगळ्या तीन ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील एकूण अशा जागा 18 आहेत. या ठिकाणी अडकलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार ज्या पध्दतीने या कामात गुंतले त्यामुळे नेहमीच्या कामांना वेसण लागली आहे. तरी पण पोलीस खात्यातील म्हणीप्रमाणे तोंड दाबून बुक्यांचा मार ही सर्व मंडळी फिक्स पॉईंट ड्युटी करत आहेत. एखादा डीओ अधिकारी जर फिक्स पॉईंटवर असेल तर त्याला अतिगरज म्हणून पॉईंट सोडून पोलीस ठाण्यात यावे लागत आहे. पॉईंट चेक करणारी पोलीस अधिकारी मंडळी तो डिओ अधिकारी का गेला, त्याची गरज काय होती, याचा विचार न करता त्याची अनुपस्थिती नोंदवत आहे. यामुळे तो पॉईंट सोडून जाणार नाही आणि आलेल्या अतिगरजेच्या कामांना फाटा देईल असाच कांहीसा प्रकार पोलीस अंमलदारांचापण होत आहे आणि त्यामुळे ज्या कोणी ही फिक्स पॉईंटची कल्पना काढली असेल त्या कल्पनेतून साध्य काय झाले हेच कळत नाही. गेले आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 10 असा 14 तासांचा वेळ या फिक्स पॉईंट ड्युटीमध्ये लावलेला आहे आणि तेथेच पोलीस अडकलेले आहेत. नांदेड शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विचार केला तर तो आकडा 8 पेक्षा जास्त नाही. त्यामुळे फिक्स पॉईंट ड्युटी आणि त्यात अडकलेले अधिकारी याचे गणित म्हणजे अत्यंत गरजेच्यावेळेस पोलीस ठाण्यात अधिकारी उपलब्ध मिळत नाहीत.
फिक्स पॉईंट लावले असले तरी प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्याला तपासणी करणे अत्यंत अवघड प्रकार आहे. शहरात आजच संजय बियाणी यांचा खून त्यांच्या घरासमोर करण्यात आला. त्यांना मारणारे मारेकरी शहरातील या 12 फिक्स पॉईंट समोरूच आले असतील ना म्हणजे आजच्या 18 फिक्स पॉईंटवर असलेले 72 लोक त्यासाठी दोषी आहेत काय ? प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्या तपासणी कशी करणारघ, मारेकऱ्याने आपल्याकडे लपवलेली बंदुक कशी पाहणार? आणि या तपासणीमध्ये चांगल्या माणसांचा विचार केला तर ते त्रासतील आणि अशा परिस्थितीत तपासणी कशी होणार ? मग राबत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या राबण्यातून कांहीही मुदा महत्वाचा मिळत नाही. मग त्यांना का राबवले जात आहे?
मारेकऱ्यांनी पळ काढला तो रस्ता आता चर्चेत आला आहे. पण या रस्त्यावरून जातांना ज्या फिक्स पॉईंटवर आज पोलीस ड्युटी करत आहेत पण त्यांना तरी काय माहिती की, मारेकरी हेच आहेत. घडलेला प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेची भिती गुन्हेगारांना नाही असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. आणि अशी परिस्थिती का तयार झाली याचा विचार केला तर सुर्याजी पिसाळ वृत्तीचे अधिकारी नांदेड जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामुळे हे असे घडत असेल असे लिहिले तर चुक ठरणार नाही. हा झालेला खूनाचा प्रकार कुठून सुरू झाला आणि कसा झाला हे सुध्दा तपासले गेले पाहिजे तरच या खूना मागील खरे “खलबत’ समोर येईल. पोलीसांनी सुध्दा त्याच दृष्टीकोणातून सर्वसामान्य जनतेला आम्ही तुमच्या सुरक्षेसाठीच राबतो आहोत हे दाखविण्याची आता गरज आहे. सर्व गाव झोपल्यावर मी तुमच्यासाठी जागतो हे सुध्दा पोलीसांनी या घटनेनंतर दाखविण्याची अपेक्षा आहे.
