गोळीबारात जखमी झालेल्या संजय बियाणींचा अखेर मृत्यू

सीसीटीव्ही फुटेज….

 

नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी 10 वाजता बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. नांदेड शहरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा नांदेड शहर हादरले आहे.
नांदेडमधील प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी हे आज सकाळी 10 वाजता आपल्या गाडीत बसून बाहेरून घरासमोर आले. घरासमोर गाडी उभी करून चार चाकी गाडीच्या मागच्या शिटवरून उजवीकडे खाली उतरले. स्वत: गोलवळसा घालून ते घराकडे निघाले. त्यांनी गाडीतून उतरताच एक भरधाव वेगात दुचाकी गाडी त्यांच्या चार चाकी गाडीसमोर जावून उभी राहिली. त्यावरून दोन युवक खाली उतरले. आणि पळत गाडीकडे आले. तोपर्यंत संजय बियाणी आपली गाडी ओलांडून गाडीच्या डाव्या बाजूने घराच्या मुख्य गेटसमोर आले होते. पळून आलेल्या दोन्ही युवकांनी आपल्या हातातील ऍटोमॅटीक पिस्तुलने त्यांच्यावर अत्यंत जवळून काही इंचांच्या अंतरावरून अनेक गोळ्या झाडल्या. या गोळ्या लागताच संजय बियाणी रस्त्यावर खाली पडले. तेथे रक्ताचा पाट वाहिला. बियाणी खाली पडताच हे मारेकरी पुन्हा आपल्या दुचाकी गाडीकडे पळाले जाताजाता त्यातील एकाने बियाणी यांच्या चार चाकी गाडीचे चालक रवि यांच्यावर गोळीबार केला. ते सुध्दा जखमी झाले आहेत.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिला असता बियाणी यांच्या घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर वर्दळ कमीच होती. एका युवकाने हा लाईव्ह गोळीबार पाहिल्याचे त्यात दिसते. पण तो सुध्दा आपली दुचाकी गाडी सोडून पळाल्याचे दृश्य त्यात आहे.
गोळीबार होताच संजय बियाणी आणि त्यांच्या ड्रायव्हर रवी यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचल्यावर त्या ठिकाणी जवळपास 10 गोळ्या फायर झाल्याचे चिन्ह दिसत होते. त्यातील 9 गोळ्यांचे रिकामे खोळ सापडले आहेत आणि एक जीवंत गोळी सापडली आहे. घटना घडताच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष करून उमरी, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद या पोलीस ठाण्यांना लागून इतर राज्यांची सिमा आहे. त्यावरील लक्ष जास्त सतर्कतेने देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी संजय बियाणी यांचा खून झाला त्या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक जागी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पोलीस विभाग जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटेज पाहुन मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी हे उमरखेडचे राहणारे आहेत. त्यांनी नांदेडला येवून बांधकाम व्यवसायात आपले हात आजमावले आणि मोठी किर्ती मिळवली होती. मागे कांही वर्षांपुर्वी हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंदा याने सुध्दा आपल्या हस्तकांमार्फत संजय बियाणी यांना धमकी दिली होती. त्यानंतर रिंदा हा माणूसच पाकिस्तानमध्ये निघून गेला त्याने तेथून मुलाखती देत हे दाखवून दिले आहे. घडलेल्या प्रकरणात पोलीसांनी यातील मुळ शोधण्याची गरज आहे. आणि सत्य समोर आणण्याची त्यांची जबाबदारी ते पुर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गोळीबार होताच एक ते दीड तासाच्या आत संजय बियाणी यांचा जीव गेला आहे. त्यांच्या शरिरावर कुठे-कुठे गोळ्या लागल्या आणि किती गोळ्या लागल्या याबदल माहिती प्राप्त झाली नाही. घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अनेक सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल झाले आहेत.

सीसीटीव्ही फुटेज….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *