नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहणे हा सर्वात मोठा विषय असून त्यासाठी मी कायम सकारात्मक विचार करतो असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
काल दि.5 एप्रिल रोजी बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी यांची हत्या झाली. हत्या झाल्याची माहिती मिळताच मी नांदेडला आलो असे अशोक चव्हाण पत्रकार परिषदे सांगत होते. या पत्रकार परिषदेत पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आणि भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले निसार तांबोळी आणि प्रमोद शेवाळे यांनी मिळून संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी विजय कबाडे यांच्याकडे दिली आहे. त्यासाठी त्यांना लागतील ते अधिकारी, कर्मचारी दिले आहेत. मी पत्रकार परिषदेनंतर बियाणी यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांच्याकडून या तपासाच्या दृष्टीकोणानुसार काय माहिती जमवता येईल ती आम्ही जमा करणार आहोत आणि या तपासाला योग्य दिशा देणार आहोत. उद्या दि.7 एप्रिल रोजी मंत्रीमंडळाची बैठक आहे. त्यात सुध्दा मी या विषयी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याशी प्रत्यक्ष बोलून घडलेला घटनाक्रम आणि त्यामागील सुत्रधार यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम सुदृढ राहावी यासाठी प्रयत्न करणे आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे हे कटीबध्द आहेत. काल घडलेल्या घटनेच्या अनुशंगाने जनतेची सुरक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कालच्या घटनेला वेगळेच स्वरुप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनेतेतील लोकांनी त्यांच्या सुरक्षेविषयी काहंी अडचण असेल तर निसार तांबोळी, प्रमोद शेवाळे किंवा थेट माझ्यासोबत संपर्क साधावा. त्यांनी सांगितलेली माहिती गुप्त ठेवण्याची मी ग्वाही देत आहे.
याप्रसंगी काल घडलेल्या घटनेच्या अनुरूप आजपर्यंत काय झाले याचे उत्तर देतांना प्रमोद शेवाळे म्हणाले आजच्या परिस्थितीत आम्ही 45 गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून माहिती जमविण्याच्या प्रयत्नात आहोत. सोबतच असंख्य सीसीटीव्ही तपासत आहोत. संजय बियाणी यांची सुरक्षा काढण्याच्या संदर्भाने बोलतांना पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी म्हणाले, संजय बियाणी यांच्याकडे सन 2020 पासून सुरक्षा नव्हती. या संदर्भाने आम्ही त्यांना प्रत्यक्ष बोललो होतो पण त्यांनी सुध्दा सुरक्षेच्या संबंधाने आमच्याकडे कांहीही सांगितले नव्हते. कांही वेगवेगळ्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारला असतो उपमहानिरिक्षक निसार तांबोळी म्हणाले हा निर्णय एका समितीच्या माध्यमाने होत असतो ती समिती तो निर्णय घेते कांही लोक आमच्याविरुध्द उच्च न्यायालयात गेलेले आहेत. उच्च न्यायालयाला आम्ही उत्तर दिलेले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर जास्त बोलणे योग्य नाही.
एसआयटीकडे जनतेच्या मोठ्या अपेक्षा
संजय बियाणी हत्येचा गुन्हा तपासासाठी एसआयटीकडे देण्यात आला आहे. या एसआयटीचे प्रमुख भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे आहेत. या एसआयटीमध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार काम करणार आहेत. पण या एसआयटीमध्ये कोणी सुर्याजी पिसाळ, मिर सादीक आणि मिर जाफर अशी वृत्ती ठेवणारा व्यक्ती आला तर या गुन्ह्याचे काय होईल? तेंव्हा अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्यावर सुर्याजी पिसाळ, मिर सादीक आणि मिर जाफर या वृत्तीच्या लोकांना आपल्या एसआयटी पथकात स्थान देवून नये जेणे करून या तपासाला वेगळे वळण लागणार नाही अशी अपेक्षा आहे.