
नांदेड(प्रतिनिधी)-गोरठा ता.उमरी येथे दोन जणांना चाकुच्या धाकावर लुटण्यात आले. सुभाषनगर किनवट आणि शिळवणी तांडा ता.देगलूर येथे दोन घरफोड्या झाल्या आहेत. सोनखेड, देगलूर, शिवाजीनगर आणि अर्धापूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकारामध्ये एकूण 4 लाख 700 रुपयांचा ऐवज लंपास झालेला आहे.
पुंडलिक रुद्राजी रामपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 एप्रिलच्या पहाटे 4.15 ते 4.30 वाजेदरम्यान फक्त 15 मिनिटात कांही जणांनी त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना अडवून त्यांच्या जवळचे चार मोबाईल आणि रोख रक्कम असा 64 हजार 700 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
संतोष शेषराव पेटकुले यांचे सुभाषनगर किनवट येथे घर आहे. 6 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेपासून ते 7 एप्रिलच्या पहाटे 2.30 वाजेदरम्यान त्यांचे सर्व कुटूंबिय मुलीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाट उघडून त्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 6 तोळ्याचे सोन्याचे दागिणे 1 लाख 22 हजार 60 रुपयांचे चोरून नेले आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
विठ्ठल रत्ना राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिलच्या रात्री 10 ते 7 एप्रिलच्या पहाटे 6 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांचा घराचा कडीकोंडा तोडून घरातील 42 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असा 69 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळा गावातून मुसा दाऊद मोमीन यांची दुचाकी गाडी 20 हजार रुपयांचे चोरीला गेली. बोरगाव ता.देगलूर येथून हनमंत रघुनाथ शिंदे यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली अशाच प्रकारे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये 4 लाख 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
