युवकांनो …सोशल मिडीयावर हत्यारासह फोटो, व्हिडीओ टाकून आपल्या भविष्याचा गळा दाबू नका 

नांदेड(प्रतिनिधी)-युवकांनो आता सोशल साईडवर आपल्या हातात बंदुकी, तलवारी, चाकू घेतले फोटो, व्हिडीओ प्रसारीत करू नका. सोबतच 302, 307 भारतीय दंडसंहितेची कलमे लिहुन त्यावर काही संदेश पाठवू नका. कारण पोलीस आता अशा युवकांविरुध्द गुन्हे दाखल करत आहे. आपल्या भविष्याशी खेळून आपले भविष्य खोलदरीत ढकलू नका.
                         सध्या युवकांमध्ये अनेक प्रकारचे फॅड तयार होत आहेत. त्या फॅडच्या माध्यमातून युवक आपल्या हातात बंदुका, तलवारी, चाकू घेवून वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो काढत आहेत. आपल्या हातातील हत्याराला दाखवत त्यावर वेगवेगळे सिनेमातील शब्द लिहित आहेत. व्हिडिओमध्ये फिल्मी डायलॉग जोडत आहेत. आणि अशा सर्व व्हिडीओंवर 302, 307 असे भारतीय दंड संहितेचे आकडे लिहित आहेत. याशिवाय बातमीत लिहिता येणार नाहीत असे शब्द लिहुन आपला हा पराक्रम अनेक सोशल मिडीयावर प्रसारित करत आहेत.परंतू या प्रसारणामुळे आपल्याला मोठेपण प्राप्त होत आहे, त्यातून आपल्याला लोक भिणार आहेत. हा त्यांचा गोड गैरसमज पोलीसांनी आज खोटा ठरवला. विमानतळचे पुन्हा एकदा नवीन पोलीस निरिक्षक बनलेले अनिरुध्द काकडे यांनी चार युवकांवर भारतीय हत्यार कायदाप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.
                         दि.8 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर 12 वाजेच्या सुमारास विमानतळचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे,त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, बालाजी केंद्रे, बंडू कलंदर आदी गस्त करीत असतांना शिवनेरी नगर नांदेड येथे सुदर्शन बालाजी सरपाते(19) आणि सुमित दिगंबर गादेकर(22) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नकली पिस्टुल जप्त केले. हे नकली लोखंडी पिस्टल खरे आहे असे दाखवून ते इतरांना दाखवत होते. दारासिंग राठोड यांच्या तक्रारीवरुन या दोन्ही युवकांविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 6/25 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 34 नुसार गुन्हा क्रमांक 121 दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही युवकांना अटक झाली आहे.याच रात्री दुसऱ्या एका घटनेत पोलीस अंमलदार बंडू कलंदर यांच्यातक्रारीवरुन मुन्नासिंग उर्फ अखिल साहेबराव राठोड (27) रा.भारतनगर सांगवी आणि आदित्य प्रकाश बाळशंकर (19) रा.रामनगर सांगवी या दोन युवकांविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25, 6/25 आणि आयपीसीचे कलम 34 नुसार गुन्हा क्रमांक 122/2022 दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा  तपास पोलीस उपनिरिक्षक रेडेकर यांना देण्यात आला आहे.
                            युवकांनो अशा प्रकारचे हत्यारासहीत फोटो काढू नका, आपल्यासोबत हत्यार बाळगु नका, हत्यारासह व्हिडीओ बनवू नका आणि ते कोणत्याही सोशल मिडीयावर अपलोड करू नका. कारण आता पोलीसांनी अशा प्रकारच्या कामांना गांभीर्याने घेणे सुरू केले आहे. आपल्या जीवनाचे भविष्य बनवतांना तुमच्या विरुध्द दाखल झालेला गुन्हा तुमच्या भविष्याला अंधाऱ्या खाईत ढकलून देणार आहे. हत्यारासह तुमचे फोटो पाहुन किती लोक भितील हा प्रश्न वेगळा आहे. पण तुमच्या जीवनावर त्याबाबीचा परिणाम आता होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सोशल मिडीयावर 302, 307 असे भारतीय दंड संहितेतील खतरनाक आकडे लिहुन काय साध्य होणार आपल्या हाताने आपल्या भविष्याचा गळा दाबू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *