मुखेड शहरात 19 वर्षीय युवकाचा सुध्दा खून
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनवमीच्या दिवशी एका 70 वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. तसेच मुखेड येथील वाघोबाच्या खोरीत देशी दुकानासमोर एका 19 वर्षीय युवकाचा खून घडला आहे.
दयानंद विठ्ठल कांबळे रा.वसरणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 एप्रिलच्या सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास वसरणी गावातील साईबाबा कमान, गॅस एजन्सीजवळील वेजवाडे यांच्या शेतासमोरच्या रस्त्यावर त्याचे 70 वर्षीय वडील विठ्ठल शेटीबा कांबळे यांना जसप्रितसिंघ उर्फ सोनु बिमारी या व्यक्तीने तु मला नेहमी काय विचारणा करतोस आज तुला मी मारुन टाकील असे म्हणत त्यांच्या छातीच्या खाली डाव्या बाजूला दोन ठिकाणी व उजव्या हाताच्या दंडावर भोकसून खून केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा 10 एप्रिलच्या रात्री 11.46 वाजता दाखल केला आहे. या गुन्ह्याचा क्रमांक 223/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 जोडण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
नियंत्रण कक्षाला पाठविण्यात आलेल्या माहितीमध्ये नांदेड ग्रामीण पोलीसांनी या घटनेची तारीख 22/04/2022 अशी लिहिलेली आहे. 22 तारीख यायला अद्याप 11 दिवस शिल्लक असतांना अत्यंत काटेकोर, प्रत्येक काम अत्यंत बारकाईने आणि खरे करण्याची जिद्द असणाऱ्या पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांना या तारखेतील घोळ लक्षात आला नाही.
रामनवमीच्या अदल्या रात्री मुखेड शहरातील वाघोबा खारीमध्ये देशी दारु दुकानासमोर गोविंद नामदेव शेळके (19) यास प्रेम उर्फ टिल्या देविदास घोटकर (19) याने लग्नाच्या समारंभातील भांडणाचा बदला काढत त्याच्या छातीवर, तोंडावर चाकुने वार करून गंभीर जखमी केले आणि त्याचा खून केला अशी तक्रार मरण पावलेला युवक गोविंद शेळके यांच्या आई महानंदाबाई नामदेव शेळके यांनी दिली. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 114/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बोधगिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तारेखचा घोळ लिहुन दाखल झाला खूनाचा गुन्हा