नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी परिसरातील एका युवकासह 6 जणांना रेल्वेत नोकरी लावतो म्हणून 41 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत माळाकोळी पोलीस ठाण्यात वाराणसी उत्तर प्रदेशातील एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
धनंजय बालाजी गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2019 पासून वाराणसी येथील ओमप्रकाश पांडे उर्फ सत्येंद्र राजेश्वर मिश्रा याने गावातील हनमंत बालाजी गायकवाड, प्रल्हाद मोहन गायकवाड, सचिन मारोती गायकवाड, नामदेव आबाराव गायकवाड, परमेश्र्वर वानखेडे आणि ते स्वत: अशा 6 जणांना रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून प्रत्येकाकडून 6 लाख 60 हजार रुपये असे एकूण 41 लाख 60 हजार रुपये बॅंग खात्याद्वारे व कांही रोख स्वरुपात घेतले आणि बनावट नेमणुक पत्र आणि ओळखपत्र देवून फसवणूक केली आहे. माळाकोळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 39/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक डोके करीत आहेत.