
नांदेड(प्रतिनिधी)-कोविड महामारी दरम्यान मरण पावलेले पोलीस पाटील बापूराव महाजन बंतलवाड यांना शासनाने मंजुर केलेले 50 लाखांचे अनुदान आज पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांच्या पत्नी कल्पना बंतलवाड यांना दिले.
कोविड-19 च्या महामारी दरम्यान आपले कर्तव्य पार पाडतांना नांदेड जिल्ह्यातील दोन पोलीस पाटलांचा मृत्यू झाला होता . त्यापैकी एका पोलीस पाटलाला शासनाच्यावतीने मंजुर झालेले अनुदान 12 मार्च 2022 रोजी धनादेशाच्या रुपात देण्यात आले होते. दुसरे पोलीस पाटील बापूराव महाजन बंतलवाड यांचे वारसा हक्कप्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने त्यांचा धनादेश तसाच होता. दि.12 एप्रिल 2022 रोजी पोलीस पाटील बापूराव बंतलवाड यांचे वारसा हक्क प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यानंतर आज दि.13 एप्रिल रोजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील लिपीक नरेंद्र कुलकर्णी या सर्वांनी मिळून 50 लाख रुपयांचा धनादेश मयत पोलीस पाटील बापूराव बंतलवाड यांच्या पत्नी कल्पना बापूराव बंतलवाड रा. जोशी सांगवी ता.लोहा जि.नांदेड यांना अदा करण्यात आला. या प्रकरणात शासनाकडील अनुदान मंजुर करून आणले आणि कागदपत्रांची योग्य पूर्तता करून घेण्याची जबाबदारी लिपीक नरेंद्र नाथराव कुलकर्णी यांनी पार पाडली.
