
नांदेड(प्रतिनिधी)-दोन वर्षापासून कोरोनाकाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ही अत्यंत मर्यादीत स्वरुपात साजरी करण्यात आली होती. यंदा मात्र महामानवाच्या अनुयायांनी भरलेला हुंकार सर्वत्र जय भीमच्या घोषणांनी निनादला होता.
कोरोना काळात मागील दोन वर्ष सर्वच सणाप्रमाणे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा सुध्दा अत्यंत मर्यादीत स्वरुपात साजरा करण्यात आला होता. शासनाने कोरोना नियमावलींमध्ये बऱ्याच सुट दिल्यानंतर यंदाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने अनुयायांनी जानेवारीपासूनच वेगवेगळ्या कल्पनांच्या आधारावर तयारी सुरू केली होती आणि एक-एक बाब जमवून महामानवाच्या अनुयायांनी भरलेला हुंकार रात्री 12 वाजेपासून सुरू झाला. अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध भिमजयंती मंडळांनी आप-आपल्या वस्त्यांमध्ये ध्वनीक्षेपकांवर लावलेल्या गितांच्या आधारे आपला आनंद व्यक्त केला. रेल्वे स्थानकासमोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रात्री सुध्दा रोषणाई करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि आपला आनंद व्यक्त करण्यात आला.
विविध भिमजयंती मंडळांनी आपल्या जयंती मंडळाची मिरवणूक काढतांना विविध देखावे तयार केले. कांही बौध्द विहारांमध्ये नवीन प्रक्रियांना सुरूवात झाली. कांही ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुर्ती बौध्द विहारांमध्ये प्रस्तापित करण्यात आल्या. 14 एप्रिलची पहाट उजाडातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेण्यासाठी रिघ लागली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर रात्रीपासून भिमगितांचा ऑर्केस्ट्रा सुरू होता. अनेक ठिकाणी अभ्यासीका तयार करण्यात आल्या, अनेकांनी अन्नदानाचे आयोजन केले होते. एखाद्या मेळ्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पायी चालणे अवघड होते. अनेकांनी अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
दुपारी शहरातील अनेक भागातून मिरवणूका निघाल्या. वाजत गाजत, आपला आनंद व्यक्त करत या मिरवणूका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत येत होत्या. प्रत्येक जण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आपल्या श्रध्दा अर्पण करत होते. वृत्तलिहिपर्यंत मिरवणुका सुरूच होत्या. प्रशासनाच्यावतीने पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृृत्वात असंख्य पोलीस अधिकारी, असंख्य पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांनी आजच्या दिवशी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होवू नये म्हणून मेहनत घेतली.
