
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी माहिती मागविण्यात आली आहे. या आदेशावर मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी पोलीस अधिक्षकांच्या मान्यतेनंतर स्वाक्षरी केलेली आहे. परिपत्रकात दिलेल्या नियमानुसारच बदल्या होतील काय? याबाबत पोलीस दलात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सन 2022 च्या सर्वसाधारण बदल्या करण्यासंदर्भाने गृहविभागाच्या आदेशाच्या संदर्भानुसार जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस हवालदार , पोलीस नाईक, पोलीस शिपाई या चार पदांसाठी दि.31 मे 2022 रोजी किंवा त्यापुर्वी पाच वर्ष खंडीत आणि अखंडीत अशी सेवा केलेल्या पोलीस अंमलदारांनी आपल्या पसंतीच्या तीन नवीन ठिकाणांसह आपले अर्ज 30 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस अधिक्षक कार्यालयात पोहचतील असे पाठवायचे आहे. हे अर्ज संबंधीत पोलीस अंमलदाराच्या प्रभारी अधिकाऱ्यामार्फत पाठवायचे आहेत. ह्या परिपत्रकात 11 अटी लिहिलेल्या आहेत. पण या 11 अटीनुसार बदल्या होतील काय ? हा प्रश्न सर्वात महत्वपूर्ण आहे. या प्रश्नाची चर्चा परिपत्रक प्रसिध्द होताच सुरू झाली आहे.
बदल्यांसाठी देण्यात आलेल्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. पोलीस अंमलदारांनी दिलेल्या पसंतीच्या ठिकाणांमध्ये स्वग्राम, स्वतालुका नसावा. पसंतीच्या ठिकाणी यापुर्वी सेवा केलेली नसावी. ज्या पोलीस अंमलदारांना अडीअडचणी आहेत, ज्यांना सध्याच्या नेमणुकी ठिकाणी पाच वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला नाही, अडीअडचणीमुळे बदली हवी आहे. त्यांना देखील वरील अटींच्या आधीन राहुन पसंतीची तिन ठिकाणे नमुद करून अर्ज सादर करायचे आहेत. परंतू त्यांच्या बदल्या होतीलच असे गृहीत न धरता प्रशासकीय सोयीनुसार त्या बाबतचा विचार होणार आहे. पोलीस अंमलदाराचा एक पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस शाखेमध्ये खंडीत, अखंडीत सेवा धरुन पाच वर्षाचा कालावधी निश्चित आहे. ज्या पोलीस अंमलदारांना एका तालुक्यात खंडीत, अखंडीत 12 वर्षाची सेवा पुर्ण केली असेल त्यांनी बदलीसाठी पसंतीचे ठिकाण कळवायचे आहे. स्वग्राम, स्वतालुका या ठिकाणी बदली किंवा नेमणुक बाबत विनंती अर्ज देवू नये. ज्या पोलीस अंमलदारांना सेवा पुस्तिका नोंद होतांना अज्ञांकित कक्षात बदलीसंबंधात विनंती केली असेल व सर्वसाधारण बदली 2022 च्यावेळी विचार करण्यात येईल असे कळविले असेल तर तसा सविस्तर उल्लेख बदलीच्या अर्जात करायचा आहे. ज्या पोलीस अंमलदारांची सध्याची नियुक्ती पाच वर्ष पुर्ण झालेली आहे. परंतू त्यांनी पसंतीची ठिकाणे कळविली नाही. तेंव्हा ते कोठेही बदलून जाण्यास इच्छूक आहेत. असे गृहीत धरुन प्रशासकीय सोयीनुसार बदल्या करण्यात येतील. पोलीस अंमलदारांनी दिलेल्या पसंतीच्या ठिकाणी रिक्त पदे नसतील किंवा कांही प्रशासकीय अडचणी असतील अशा परिस्थितीत प्रशासकीय सोयीनुसार बदल्या होती. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या संवर्गातील कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या स्वग्राम असलेल्या तालुक्यात नेमणुक किंवा बदली मिळणार नाही. मात्र सेवानिवृत्तीस तीन वर्ष बाकी असल्यास व त्यांची विनंती असल्यास त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात नेमणुक करता येईल. पोलीस मुख्यालयात काम करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू नाही. ज्यांना बदलीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी आपला अर्ज पोलीस अधिक्षक नांदेड यांना उद्देशुन लिहायचा आहे. आपल्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे तो सादर करायचा आहे. कोणताही पोलीस अंमलदार बदलीचा अर्ज घेवून थेट पोलीस अधिक्षक कार्यालयात येणार नाही. कार्यालयात तसा थेट अर्ज स्विकारला जाणार नाही. आपल्याकडे अधिनस्त असलेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे अर्ज प्रभारी अधिकाऱ्याने 30 एप्रिल 2022 रोजी आपल्या अभिप्रायासह स्वतंत्ररित्या सादर करायचे आहेत. हे सर्व अर्ज 30 एप्रिल पर्यंत खास दुतामार्फत एकत्रित रित्या सादर करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांची आहे.
नियम बरेच असतात त्यानुसारच परिपत्रके निघतात. पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्यात असे दाखवले जाते. पण अनेक वर्ष ते एकाच जागेवर कार्यरत आहेत. अशी ही अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या पोलीस अंमलदाराची बदली कोठे असेल पण तो काम वेगळ्यास जागी करतो. कांही पोलीस अंमलदार तर 10 ते 12 वर्षापासून एकाच ठिकाणी ठान मांडलेले आहेत. असंख्य पोलीस अंमलदार पुन्हा-पुन्हा त्याच जागेवर येतात. या सर्व प्रकारामुळे पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांची नेहमीच अडचण होत राहिलेली आहे. यंदाच्या बदल्यांमध्ये तरी सर्वांना न्याय मिळेल अशा बदल्या होतील अशी अपेक्षा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना आहे.
