गावठी कट्‌ट्यांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना एलसीबीने पकडले

न्यायालयाने पाठविले पोलीस कोठडीत; चार खरे कट्टे आणि एक खेळणी कट्टा जप्त

नांदेड(पी.के.गजभारे)-दरोड्याची तयारी करून रस्त्याने-येणाऱ्या-जाणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर लुटण्याच्या बेतात असणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून चार बनावट कट्टे आणि एक खेळण्याची पिस्तुल अशा पाच बंदुकी जप्त केल्या आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आ.पी.घोले यांनी या पाच जणांना पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव मुंडे साहेब, पोलीस अंमलदार दशरथ जांभळीकर, सखाराम नवघरे, अफजल पठाण, विठ्ठल शेळके,मारोती तेलंग, गुंडेराव कर्ले, शंकर केंद्रे, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, हनुमंत पोतदार, रुपेश दासरवाड, पद्मसिंग कांबळे, देविदास चव्हाण, बजरंग बोडगे, गणेश धुमाळ , शेख मोहसीन आणि संजय केंद्रे आदींना संजय बियाणी हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले. गस्त करत असतांना या पथकाला गुप्त माहिती मिळाली श्रावस्तीनगर भागात कांही जण गावठी कट्‌ट्यांसह लपून बसलेले आहेत आणि नसरतपुर ते शिवाजीनगर या रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना पिस्तुलाच्या धाकावर लुटत आहेत. तेंव्हा या पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीनुसार श्रावस्तीनगर भागात नाल्याजवळ बाभळीच्या झुडूपांमध्ये संशयीत रित्या दबाधरुन बसलेल्या मनिष अशोक कांबळे (32), दक्षक उर्फ खरब्या बालाजी सरोदे (25), अक्षय उर्फ सोनु दिगंबर शंकपाळ (30), प्रशांत उर्फ बाळा रोहिदास सोनकांबळे (34), अतुल बबनराव चौदंते (22) अशा पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे बनावटी अग्नीशस्त्र(कट्टे) पकडले. त्यात चार खरे कट्टे आणि एक खेळण्याचे पिस्तुल आहे. या पाच जणांना अझर खान उर्फ बांगा अझर रहिमोद्दीन खान याने हे कट्टे पुरवलेले आहेत. पोलीसांनी या कट्यांसोबत दोन जीवंत काडतुसे पकडली आहेत. एक दोरी, चार मोबाईल असा एकूण 1 लाख 25 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठानुसिंह चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 145/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 399, 402 आणि सह कलम भारतीय हत्यार कायदा 3/25, 6/28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जळबाजी गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.

आज दि.20 एप्रिल रोजी पकडलेल्या पाच जणांना शिवाजीनगर पोलीसांनी न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली ती न्यायालयाने पाच दिवस अर्थात 25 एप्रिल 2022 पर्यंत मंजुर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *