नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये जुन्या संचालकांनी एक मोकळा भुखंड (ओपन स्पेस) लाटल्यानंतर नवीन बेघर पत्रकार संचालकांनी दुसरा मोकळा भुखंड (ओपन स्पेस) लाटल्याचा एक नवीन धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बेघर पत्रकारांसाठी महानगरपालिकेने सर्वसामान्य माणसाच्या मालकीची दोन एकर जागा बेघर पत्रकारांना दिली. त्यावर जुन्या संचालकांनी एका विधवा महिलेला आधार देण्यासाठी एक भुखंड त्यांना दिला. ती विधवा महिला या भुखंडावर आपल्या मुलासह राहु लागली. दुर्देवाने जुन्या बेघर पत्रकारांच्या अध्यक्षांचा मृत्यू झाला आणि नवीन छदमी बेघर पत्रकार या सोसायटीमध्ये अवतरले. यांची तर सांगता सोय नाही ऐवढे किसे आहेत ज्यातून कांही आम्ही लिहिले आहेत, कांही आम्हाला अपुर्ण माहित असल्यामुळे लिहिलेले नाहीत आणि आम्हाला सुध्दा आजपर्यंत गुप्त असतील या किस्याबद्दल तर बोलण्याचा आम्हालाही हक्क नाही असो.
नवीन बेघर पत्रकारांचे संचालक आल्यानंतर एका भुखंडावर राहिलेल्या त्या महिलेचे निरिक्षण करण्यात आले. तिला तेथून जाण्यास सांगितण्यात आले. पण तिने आपल्या जीवनाची जमा पुंजी या भुखंडावर लावून त्यावर आपला संसार चालवत होती. त्यामुळे ती कणखर राहिली आणि बेघर पत्रकारंासमोर कोरडा घेवूनच उभी राहिली. त्यामुळे बेघर पत्रकारांनी चाणाक्ष नितीचा वापर करून त्यानंतर या दोन एकर जमीनीचा लेआऊट बनविला आणि त्या लेआऊटमध्ये महिलेच्या ताब्यात असलेला भुखंड मोकळी जागा(ओपन स्पेस) दाखविला. पण बिचारी अशिक्षीत महिला तिला ओपन स्पेसशी काही देणे-घेणे नाही म्हणून ती मरेपर्यंत तेथच राहिली. तिच्या मुलाने नंतर तो मोकळा भुखंड सर्व सत्य परिस्थिती सांगून कोणाला तरी विक्री केला.
जुन्या बेघर पत्रकारांच्या संचालकांनी केलेल्या या भुखंडाच्या कामावर नाराज असलेले नवीन बेघर छदमी पत्रकार इरेला पेटले. त्यांनी सुध्दा दुसरा मोकळा भुखंड(ओपन स्पेस) एकाला देवून टाकला. त्या ठिकाणी लाईट मिटर घेता येत नाही म्हणून त्याला पत्रकार अधिवास गृहनिर्माण सोसायटीच्या नावावर लाईट मिटर सुध्दा मिळवून दिले. अशाच प्रकारे या ओपन स्पेसमधील घराला पाणी मिळावे म्हणून अनाधिकृत नळ सुध्दा घेण्यात आला आहे. अशा प्रकारे मोकळ्या जागेचा धंदा करणाऱ्या या बेघर पत्रकारांवर महानगरपालिकेने दाखवलेली दया दृष्टी चुकीचीच आहे.
सर्वसामान्य नांदेडकरांच्या मालकीची ही दोन एकर जागा त्यात बेघर पत्रकारंानी केलेला भुखंडांचा धंदा आणि सोबतच ओपन स्पेसची लावलेली वाट महानगरपालिका गप्पपणे पाहण्याशिवाय दुसरे काही करत नाही. किती दुर्देवी प्रकार या प्रगल्भ लोकशाहीमध्ये दिसतो. या महानगरपालिकेत एक हाती सत्ता असतांना सुध्दा कोणी निर्णय घेण्यास धजावत नाही. सर्वसामान्य माणसाची एक छोटीशी चुक झाली तर त्याच्या बांधकामावर हातोडा मारल्याशिवाय न राहणारी महानगरपालिका या बेघर पत्रकारांच्या भुखंड धंद्याला अभयच देत आहे.