नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-नायगाव रस्त्यावर कापसी गुंफा गावाजवळच्या मंदिराजवळ एक जबरी चोरी झाली आहे. अशीच जबरी चोरी मुदखेड-वरदळा रस्त्यावर घडली आहे. तिसरी जबरी चोरी पोटा शिवारात घडली आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेतून साहित्य चोरण्यात आले आहेत. मुदखेड येथील ऐरिगेशन कार्यालय तोडून त्यातून चोरी झाली आहे. मेंढला ता.अर्धापूर येथून एक आणि डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथून एक अशा दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकरांमध्ये 4 लाख 95 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
जलसंपदा विभागातील परबत लक्ष्मण कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 एप्रिलच्या रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ते मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 बी.आर.1336 वर बसून नांदेड ते नायगाव रस्त्यावर कापसी गुंफा येथील मंदिराजवळ पोहचले असता तीन अज्ञात मोटारसायकलवरील दरोडेखोरांनी त्यांच्या जवळचे 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य ज्यामध्ये 1 लाख रोख, मोबाईल व मोटारसायकल असे साहित्य बळजबरीने चोरून नेले. उस्माननगर पोलीसांनी हा दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पठाण अधिक तपास करीत आहेत.
नरेश वामनराव सगर हे 26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास मुदखेड ते वरदळा रस्त्यावर दुचाकीने प्रवास करत असतांना वरदळा तांड्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका दुचाकीवर आलेल्या 3 दरोडेखोरांनी त्यांना थांबवून त्यांच्या खिशातील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि एक प्रिंटर मशीन पाच हजार रुपयांची असा 15 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक राणी भोंडवे अधिक तपास करीत आहेत.
पोटा शिवारात 26 एप्रिल रोजी दुपारी 1.45 वाजता भारत फायनान्स कंपनीचे सुमेध लक्ष्मण डोंगरे हे फिल्ड ऑफीसर दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.एस.6523 वर बसून आपली वसुली करून हिमायतनगरला जातांना तीन अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना थांबवून मिर्चीची पुड डोळ्यात टाकून त्यांची बॅग बळजबरीने चोरून नेली. या बॅगमध्ये 1 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम होती. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी महाजन अधिक तपास करीत आहेत.
वजिरबाद भागातील मल्टिपर्पज हॉस्कुलचे अधिक्षक मदन भागवत हागवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 एप्रिलच्या रात्री 8 ते 25 एप्रिलच्या पहाटे 7 वाजेदरम्यान हायस्कुलच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अभिलेखावरील विविध फाईल व प्रिंटर असा 15 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
मुदखेड येथील पैनगंगा प्रकल्प उपविभाग-19 चे गोडाऊन कोणी तरी 18 एप्रिलच्या सायंकाळी 6 ते 19 एप्रिलच्या सकाळी 11 वाजेदरम्यान फोडले. त्यातून 12 लोखंडी गेट ज्या प्रत्येक गेटची किंमत 10 हजार रुपये असा 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. याबाबतची तक्रार कैलाश विठ्ठलराव कपाळे यांनी दिलेल्या नंतर मुदखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे अधिक तपास करीत आहेत.
मेंढला ता.अर्धापूर येथे दत्तात्रय उत्तमराव नवले यांनी 10 फेबु्रवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता उभी केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.26 झेड 9417 ही 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी दुपारी 2 वाजेच्यासुमारास चोरीला गेली. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. तपास पोलीस अंमलदार बोदमवाड हे करीत आहेत.
स्वयंम बाळासाहेब भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या वाहनतळात त्यांनी 26 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता उभी केलेली त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एफ.6016 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
तीन जबरी चोऱ्या, दोन घर फोड्या, दोन दुचाकी चोऱ्या; पाच लाखांचा ऐवज लंपास