नांदेड(प्रतिनिधी)-गोंदिया जिल्ह्यातून बोलावून एका महिलेचे 8 लाख रुपये घेवून तिला बनावट 30 लाख रुपये दिल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था असलेल्या सुनंदा महेंद्र रामटेके यांची ओळख नांदेड येथील कोणी तरी अशोक पाटील नावाच्या व्यक्तीसोबत झाली. या भेटी नंतर आपसातील बोलण्यातून तुमच्या संस्थासाठी मी निधी मिळवून देतो असे अशोक पाटीलने सुनंदा रामटेके यांना सांगितले. आपल्या संस्थांसाठी निधीची गरज आहेच म्हणून सुनंदा रामटेेकेंनी अशोक पाटीलसोबतची ओळख फोनवरच वाढवली. त्यानुसार एक दिवस ठरला आणि 26 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजेच्यासुमारास अशोक पाटीलने शासकीय रुग्णालय विष्णुपूरी परिसरात सुनंदा रामटेके यांना बोलावले. 30 लाखांचे बंडल सेलो टेपने पॅक केलेले अशोक पाटीलने सुनंदा रामटेके यांना दाखवले आणि त्यांच्याकडील 8 लाख रुपये घेवून तथाकथीत अशोक पाटील पळून गेले. नंतर तपासणी केली असता त्या 30 लाखांच्या बंडलांमध्ये फक्त पहिलेच चार नोट 500 रुपये दरांचे होते. त्याखाली कागद जोडण्यात आले होते. आपली फसवणूक झाल्याची माहिती सुनंदा रामटेके यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील आदरनिय, गुन्हेगारांचे कर्दनकाळ, मागील एक वर्षापासून तोंडी आदेशावर कार्यरत असलेले, अधिकाऱ्यांना हवे असणारे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना दिली. त्यांच्या आदेशानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 254/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेची 8 लाखांची फसवणूक