पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी दाखल केले होते दोषारोप पत्र

नांदेड,(प्रतिनिधी)- पत्नीला जिवंत जाळणारा नवरा,त्याची आई आणि बहीण अश्या तिघांना १४ वर्षांनंतर उदगीरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मणेर यांनी जन्मठेप आणि प्रत्येकास २५ हजार रुपये रोख दंड असा एकूण ७५ हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.या प्रकरणाचा तपास तेव्हा पोलीस उप निरीक्षक असलेले आणि सध्या नांदेड शहरात इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी केला होता.
दिनांक ६ जुलै २००८ रोजी स्नेहा सुरेंद्र चव्हाण यांनी ९२ टक्के जळालेल्या अवस्थेत उदगीर पोलिसांना जबाब दिला होता की,सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचा नवरा सुरेंद्र भारतसिंह चव्हाण,सासू राजाराणी चव्हाण आणि नणंद सुधा रुपेश बयास या तिघांनी करणी धरणी या कारणासाठी तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले आहे.तेव्हा उदगीर पोलिसांनी याबाबत गुन्हा क्रमांक ८३/२००८ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७,४९८,३२३, ५०४ नुसार दाखल केला.उपचारा दरम्यान स्नेहा सुरेंद्र चव्हाणचा मृत्यू झाला.त्या नंतर या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ ची वाढ झाली.या गुन्ह्याचा तपास उदगीरचे तत्कालीन पोलीस उप निरीक्षक आणि आज नांदेड शहरात इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असलेले भगवान धबडगे यांनी केला. सुरेंद्र भारतसिंह चव्हाण,सासू राजाराणी चव्हाण आणि नणंद सुधा रुपेश बयास विरुद्ध उदगीर न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
न्यायालयात हा खून खटला तब्बल १४ वर्ष सुरु होता.या प्रकरणात उपलब्ध तोंडी आणि लेखी पुरावे ग्राह्य मानून न्या.मणेर यांनी स्नेहा सुरेंद्र चव्हाणचा खून केल्याप्रकरणी तिचा नवरा सुरेंद्र चव्हाण,सासू राजाराणी चव्हाण आणि नणंद सुधा रुपेश चव्हाण अश्या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकास २५ हजार रुपये रोख दंड असा एकूण ७५ हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.या खटल्यात सरकारी अभियोक्ता ऍड.जी.सी.सय्यद यांनी काम पाहिले. सन २००८ मध्ये हा खून प्रकार घडला होता तेव्हा मोठा रोष तयार झाला होता.दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी या खटल्याचा निकाल तब्बल १४ वर्षांनीं आला आणि दोषींना शिक्षा झाली आहे.मयत स्नेहा चव्हाणच्या माहेरच्या नातलगांनी आणि ज्यांना या प्रकरणाची माहिती आहे अश्या सर्वानी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.