नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने बाह्य यंत्रणेच्या मार्फत कांही पदांवर माणसे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय वित्त विभागाने 27 एप्रिल रोजी जारी केला आहे. या शासन निर्णयावर वित्त विभागाचे उपसचिव रमाकांत घाटगे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. हा शासन निर्णय घेतांना सण 2010 ते 2020 दरम्याचा 6 शासन परिपत्रके आणि एक शासन निर्णय असे एकूण 7 संदर्भ जोडण्यात आले आहेत. त्यामुळे बरीच शासकीय कामे आता कंत्राटदारांकडे जातील अर्थातच शासकीय कामांचे खाजगीकरण करण्यामध्ये हे एक पाऊल आहे.
राज्य शासनाने शासनावर होणारा खर्च अटोक्यात राहावा आणि विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तेथे पद निर्मिती न करता ती कामे बाह्य यंत्रणेकडून करून घेण्यात यावी असे शासन परिपत्रक 2010 मध्ये जारी केले होते. शासनाकडे बाह्य यंत्रणाकडून काम करून घेण्यासाठी काल्पनीक पदे तयार करायची आणि त्यांना मंजुरी द्यायची याचे अधिकार मुख्य सचिव सेवा यांच्याकडे देण्यात आली. कालानुरूप कांही बदल करणे आवश्यक असेल तर शासनाच्यावतीने सर्वसमावेश आदेश देण्यात येतील अशी सोय होती.
त्यानुसार आता शासनाने निर्णय घेतला आहे की, बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेतांना हे पाहण्याची गरज आहे की, नविन पदनिर्मिती करून यासाठी किती खर्च येईल. त्या खर्चात 20 ते 30 टक्के इतकी बचत होवून ती कामे करून घ्यावी. बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्याकरीता कोणतीही पदनिर्मिती केली जाणार नाही. काल्पनिक पदांचे वर्गीकरण शासनाने कुशल पदे आणि अकुशल पदे अशी केली आहेत.
हा सर्व निर्णय घेत असतांना शासनाने मंत्रालयीन विभागातील लिपीक, टंकलेखक, स्विय सहाय्यक, लघु टंकलेखक, सर्व कार्यालयांचे कनिष्ठ लेखापाल एवढी पदे बाह्य यंत्रणेच्या सेवेतून वगळली आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच ठेकेदार, कंत्राटदार, कंपनी, संस्थेकडून कामे करून घेण्यासाठी शासनाने विहित केलेले नियम व कार्यपध्दती यांचे अनुपालन आवश्यक आहे. हे या शासन निर्णयात नमुद केले आहे. ज्या कंपनीस, ठेकेदारास, संस्थेस हे काम दिले जाईल. त्यांच्यासोबत करार करायचा आहे. या करारात त्या-त्या विभागाच्या गरजेनुसार अटी व शर्ती नमुद करायच्या आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यात येणाऱ्या कामांचे प्रदान वेतन या तपशीलवार शिर्षाखाली न करता कंत्राटी सेवा या शिर्षाखालीच करावे असे या शासन निर्णयात नमुद आहे.
या शासन निर्णयानुसार आता बहुतांश कार्यालयामध्ये कंत्राटीपध्दतीने कामे सुरू होणार आहेत म्हणजेच खाजगीकरणाकडे वळण्याचाच हा एक प्रकार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय संकेतांक क्रमांक 202204271807306405 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
महाराष्ट्र शासनाचे खाजगीकरणाकडे एक पाऊल ; अनेक कामे कंत्राटीपध्दतीवर होणार