नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडणे सुरू झाले. काल एका प्रकरणात न्यायालयाने खंजीर सापडलेल्या एका युवकला जामीन नाकारुन त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
दोन दिवसापुर्वी पोलीसांनी शिवनगर नांदेड भागातील युवक योगेश भिमा सोळंके यास एका खंजीरसह पकडले होते. विमानतळ पोलीस ठाण्यात योगेश सोळंकेविरुध्द भारतीय हत्यार कायद्यातील कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 159/2022 दाखल झाला. मागील 26 दिवसांपासुन पोलीस विभागाने हत्यारे बाळगणाऱ्या लोकांचा शोध सुरू केला आणि त्यात भरपूर लोकांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले.
विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात योगेश भिमा सोळंके या युवकाला खंजीरसोबत पकडल्यानंतर काल दि.29 एप्रिल रोजी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने योगेश सोळंकेला न्यायालयीन कोठडीत घेतल्यानंतर त्याच्यावतीने आलेला जामीन देण्यासाठी अर्ज फेटाळून लावला आणि त्याची रवानगी तुरूंगात केली. भारतीय हत्यार कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये प्राथमिक न्यायालयाने पहिल्यांदाच असे केले अशी चर्चा होत आहे. बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगणे हा प्रकार चुकीचाच आहे आणि न्यायालयाने योगेश सोळंकेला नाकारलेली जामीन योग्य आहे अशा प्रतिक्रिया निमित्ताने उमटत आहेत.