नांदेड(प्रतिनिधी)-आमदुरा शिवारात एका 19 वर्षीय युवकाचे प्रेत सापडल्यानंतर काल 2 मे रोजी खळबळ माजली. मुदखेडचे पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांनी सांगितले की, आम्ही या युवकाच्या मारेकऱ्याला लवकरच गजाआड करणार आहोत.
शंकर व्यंकटराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 एप्रिल सकाळी 9 पासून त्यांचा मुलगा चंद्रकांत उर्फ चांदु शंकर पवार (19) हा घरी आला नाही. 2 मे रोजी चंद्रकांत उर्फ चांदुचा मृतदेह आमदुरा शिवारात सापडला. याबाबत मुदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 104/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मुदखेडचे पोलीस निरिक्षक महेश शर्मा हे करीत आहेत.
2 मे रोजी युवकाचा मृतदेह सापडला आणि नांदेड जिल्ह्यात खून झालेल्या संख्येत आणखी एक वाढ झाली. कांही व्हिसल ब्लोअर आपल्या संकेतस्थळांवर आताचे पोलीस अधिकारी खोटे गुन्हे दाखल करण्यात मग्न आहेत अशी पोस्ट व्हायरल करीत आहेत. त्यांच्या मते बदलुन गेलेले पोलीस अधिकारी नांदेडला हवे आहेत. पण जे बदलून गेलेत ते आज पोलीस उपमहानिरिक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. मग त्यांना नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक पद कसे देता येईल याबाबत मात्र हे व्हिसल ब्लोअर काही लिहित नाहीत. काही सुर्याजी पिसाळ वृत्तीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन किंवा त्या अधिकाऱ्यांनी या व्हिसल ब्लोअरला हाताशी धरुन नक्कीच कांही तरी खलबत चालवले आहे हे आजच्या अधिकाऱ्यांनी ओळखण्याची गरज आहे.
मुदखेड येथील खून प्रकरणाबाबत मुदखेडचे पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता चंद्रकांत उर्फ चांदु हा 29 एप्रिल रोजी घरून किराणा साहित्य आणण्यासाठी निघाला होता पण तो परत आलाच नाही याबाबत शोध घेतला असता 2 मे रोजी त्याचा मृत्यदेह सापडला आहे. या संदर्भाने आम्ही तपास करीत असून युवकाच्या मारेकऱ्यांना लवकरच गजाआड करू असा विश्र्वास महेश शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
आमदुरा शिवारात 19 वर्षीय युवकाचे प्रेत सापडले ; खूनाचा गुन्हा दाखल