
नांदेड,(प्रतिनिधी)- आजकाल धावपळीच्या आयुष्यात प्रवासात मोबाईल, दागिने किंवा अन्य वस्तू वाहनातच विसरून राहतात. त्या परत मिळण्याची अपेक्षा ही नसते. परंतु समाजात अनेक प्रामाणिक लोक ही आहेत, जे दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करताना आपल्या तत्वांशी तडजोड करीत नाहीत. असाच प्रत्यय मंगळवारी अक्षय तृतीयेला आला. महापालिकेतील विजय कुमार शर्मा हे ऑटो ने प्रवास करीत असताना, त्यांचा महागडा मोबाईल ऑटोत विसरला. बराच वेळाने त्यांच्या लक्षात ही बाब आली होती. त्यामुळे मोबाईल मिळण्याची आशाही सोडली होती. तेवढयात काबरा नगर येथील ऑटो चालक अरविंद ठाकूर यांनी मोबाईल मध्ये शेवटचा डायल असलेला द्वारकादास शर्मा यांचा नंबर लावला. त्यानंतर लगेच तो मोबाईल विजय कुमार शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ऑटो चालक ठाकूर यांच्या प्रामाणिक पणाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी द्वारकादास शर्मा, डॉ. दीपेश कुमार शर्मा, रुद्रांश शर्मा, अशोक ठाकूर यांची उपस्थिती होती.