नांदेड(प्रतिनिधी)-हरियाणा पोलीसांनी करनाल जिल्ह्यात आरडीएक्स पावडर पकडले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात हाय अर्लट झाल्या. पण नांदेड शहर पोलीस उपविभागाच्या पोलीस उपअधिक्षक देशमुख साहेबांना मात्र उद्या, 7 मे च्या दुपारी 12 वाजेपर्यंत नांदेड शहरातील कोचिंग क्लासेसची माहिती हवी आहे.
आज नांदेड शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी जावक क्रमांक 163/2022 नुसार एक आदेश जारी केला आहे. या आदेशाच्या प्रति पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर आणि विमानतळ यांना पाठविल्या आहेत. या आदेशाची एक प्रत माहितीस्तव अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांना पण पाठविण्यात आली आहे. या आदेशानुसार आदेशातील विषय कोचिंग क्लासेसची माहिती पाठवणे बाबत असा आहे. या आदेशानुसार पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांना उद्या दि.7 मे 2022 च्या दुपारी 12 वाजता प्रत्येक पोलीस ठाण्यातील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस अंमलदार हे त्यांच्या कार्यालयात बिनसुक हजर राहतील असे लिहिले आहे. त्यातील बिनसुक हा शब्द बिनचुक असा असेल. टाईपिंग करतांना चुक झाली असेल. सोबतच यात कोणतीही हायगय आणि निष्काळजीपणा होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.
या आदेशात माहिती कशी असावी याचा तक्ता तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये पहिले अनुक्रमांक, कोचिंग क्लासेसचे नाव व पुर्ण पत्ता, कोचिंग क्लासेसच्या प्रमुखाचे नाव व मोबाईल नंबर, शिक्षकाचे नाव व मोबाईलनंबर, विद्यार्थ्यांची संख्या यात बायो ग्रुपचे वेगळे आणि मॅथ ग्रुपचे वेगळे असे लिहुन पाहिजे आहे. क्लासेसच्या सुरू होण्याची वेळ आणि संपण्याची वेळ सुध्दा पोलीस उपअधिक्षक देशमुख यांना हवी आहे. या आदेशात अनेक जागी मराठी भाषेचे वाभाडे काढण्यात आले आहेत. सध्या नांदेड जिल्हा कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची चिंता सर्व जिल्ह्याला नव्हे तर राज्याला असतांना पोलीस उपअधिक्षक देशमुख यांना क्लासेसची चिंता दिसत आहे.