नांदेड(प्रतिनिधी)-वाडी (बु) येथे गट क्रमांक 141 मधील जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी दिल्याचे जागवून इतर गटांमधील गरीबांची घरे पाडून त्यावर रस्ता तयार होत आहे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याप्रकरणात 20 जून 2022 पर्यंत “जैसे थे’ चा आदेश दिलेला आहे. या आदेशाच्या उल्लंघन राज्याचे मंत्री अशोकराव चव्हाण, आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन करणार काय असा प्रश्न प्रभाकर रामचंद्र पवार, किशन रामचंद्र पवार यांनी दिलेल्या निवेदनातून समोर आला आहे.
वाडी (बु) येथे काही दिवसांपुर्वी 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी 10 एकर गायरान जमीन देण्यात आली. परंतू गायरान जमीन सोडून असलेल्या इतर गट क्रमांकाची जागा ताब्यात घेतली जात होती. त्याविरोधात नांदेड न्यायालयात दिवाणी वाद क्रमांक 214/2022 दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार नांदेड, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड हे प्रतिवादी आहेत. 8 एप्रिल 2022 रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणात 20 जून 2022 पर्यंत जैसे थेचा आदेश दिलेला आहे. परंतू रस्त्याचे कामकाज सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या भुमीपुजनाला जाण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत जलदगतीने रस्ता तयार होत आहे. या संदर्भाचे एक निवेदन प्रकाश रामचंद्र पवार, किशन प्रभाकर पवार यांनी 5 मे 2022 रोजी भाग्यनगरच्या पोलीस निरिक्षकांना दिले आहे.
या प्रकरणातील पवार यांचे वकील ऍड. कपील पाटील यांनी सांगितले की, गट क्रमांक 122 मधील जागा काही गरीब मंडळींच्या मालकीची आहे. गट क्रमंाक 141 ची जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी दिलेली आहे. तरी पण गट क्रमांक 122 मधून 141 मध्ये जाण्यासाठी डांबरी रस्त्याचे काम सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघन होत आहे. असा एक स्वतंत्र अर्ज 5 मे रोजी उच्च न्यायालयात सुध्दा देण्यात आला आहे. तरी पण याठिकाणी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. जमीन ज्या व्यक्तीच्या मालकीची आहे. त्यामध्ये कोण याचे आणि कोण नाही हे मालक ठरवत असतो. तरीपण जिल्हाधिकारी डॉ.विपीन, तहसीलदार किरण अंबेकर व भुमिअभिलेख कार्यालयाचे व्यक्ती त्या जागांवर जावून गरीबांची घरे पाडून रस्ता तयार करत आहेत. ही गट क्रमांक 122 ची जागा आमची आहे. या जागेमधून कोणी राजकीय नेता, सरकारी अधिकारी, बळजबरीने जात असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे प्रभाकर रामचंद्र पवार हे सांगत होते.
