नांदेड,(प्रतिनिधी) – नांदेड शहरात संरक्षित वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचा उपयोग मेजवाणी साठी करण्यात आला.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नील गायीला मारणाऱ्या फक्त एकाला अटक केली आणि दोघांना फरार दाखवून आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे दाखवले खरे पण नील गायीचे मांस खाणारे,विक्री करणारे सर्वच वाचले असेच दिसत आहे. भारतीय जनता पार्टीने आता याबाबत निवेदन दिले आहे.मांस सुद्धा हरणाचे नव्हते याचे स्पष्टीकरण वन विभागाने दिले आहे.
दिनांक ८ मे रोजी चैतन्यनगर भागातील एका घरातून वन विभागाने एका क्विंट्टल पेक्षा जास्त मांस पकडले.ते एका वातानुकूलित कक्षात ठेवलेले होते.याबाबत वन विभागाने एक गुन्हा दाखल केला आहे.त्यात मोहंमद फसियोद्दीन मोहमंद रहिमोद्दीन यास अटक पण करण्यात आली आहे.वन विभागाकडे शेड्युल तयार करण्यात आलेले आहेत.त्यात वन्य जीवांच्या संरक्षणाचे गांभीर्य नमूद करण्यात आले आहे.नील गाय सुद्धा संरक्षित वन्य जीव आहे.नांदेड जिल्ह्यात वन्य जीवांची संख्या भरपूर आहे.त्यात मुदखेड तालुक्यातील वाई शिवारात चिंकारा हरीण,नील गाय,बिबटे आदी अनेक वन्य जीव आढळतात. नांदेड वन विभागाने काही वर्षांपूर्वी एकदा जिल्ह्यातील सर्व वन्य जीवांची आकडेवारी प्रसारित केली होती. पण नंतर मात्र असे काहीच प्रसारण झालेले नाही.
जिल्हा पोलीस दलाकडे गस्ती पथक असते तसे वन विभागाकडे सुद्धा असते.मग नील गायीची शिकार झाली तेव्हा गस्ती पथक कोठे होते.वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होती तेव्हा अजून मांस कोणत्या प्राण्याचे आहे हे तपासायचे आहे अशी त्रोटक उत्तरे देण्यात आली होती.वाई परिसरातील नागरिक सांगतात की हि शिकार चिंकारा हरिणाची होती.ती २ मे रोजी करण्यात आली होती.तसेच काही जण सांगतात की.दोन नील गायीची हत्या करण्यात आली होती.वन विभागाने निल गायीची हत्या झाली आहे असे स्पष्ट केले आहे.ते तपासणी झाली म्हणूनच केले असेल. असो प्रत्येक सरकारी प्रक्रियेमध्ये बरेच लूप होल असतात ! पण सध्यातरी एक आरोपी अटक आणि दोन फरार दाखवून वन विभागाने आपली जबाबदारी संपल्याचे दाखवले आहे.
११ मी रोजी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा अध्यक्ष यांनी मुख्य वन परिक्षेत्र अधिकारी नांदेड यांना एक निवेदन दिले आहे.ज्या मध्ये मांस नील गायीचे होते की हरणाचे यात संभ्रम असल्याचे लिहिले आहे.तसेच ते मांस खाणाऱ्यांमध्ये दोन तीन मोठे नेते असल्याचे मनुंद आहे.ते तर बाहेरून आले होते.त्यांनी आणि नांदेडच्या अनेकांनी त्या मांसावर ताव मारलेला आहे.मांस हरणाचे असेल तर ती हत्या जास्त गंभीर आहे.तेव्हा वन विभागाने मांस कोणत्या वन्य जीवाचे होते,कोणी कोणी मारले,कोणी कोणी त्या मेजवानीची तयारी केली.त्या सर्वांची नावे जाहीर करावी अशी मागणी केली आहे. वन्य जीव प्रेमी संघटना सुद्धा या बाबत अत्यंत रोषात आहेत.ते मनेका गांधी यांच्यासोबत संपर्कात आहेत.तेव्हा या वन्य जीव हत्या प्रकरणाचे कवित्व अजूनही लांबणार आहेच असे सध्या तरी दिसते आहे. वाई परिसरात शिकाऱ्यानी यापूर्वी सुद्धा अनेक वन्य जीवांची हत्या केल्याची माहिती ग्रामस्थ सांगत आहेत.त्यात बिबट्याचा सुद्धा समावेश असेल असेही लोक सांगतात.बिबट्याच्या हत्येचा उल्लेख भाजपच्या निवेदनात सुद्धा आहे.
बियाणी प्रकरण आणि वन्य जीवाची हत्या प्रकरण
नांदेड जिल्हा पोलीस दलात संजय बियाणी हत्या प्रकरण अत्यंत गाजलेले प्रकरण आहे.त्या प्रकरणात ३१ दिवस उलटले तरी काही एक सुगावा पोलिसांना लागलेला नाही त्यातही राजकीय प्रेशर असल्याची चर्चा सुरु आहे.पुढे वन विभागाचे हे वन्य जीव हत्या प्रकरण एक नवीन चर्चेला आले.त्यात वन्य जीवाचे मांस खाणाऱ्यांना शोधण्यासाठी वन विभागावर सुद्धा राजकीय प्रेशर असेल अशी चर्चा सुरु आहे.म्हणजे राजकीय प्रेशर असेल तर माणूस काय आणि वन्य जीव काय यांची हत्या करता येते असे म्हणावे काय ?