नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या लाच लुचपत विभागाने दोन अभियंत्यांना १० हजार रुपयांची लाच घेणे आणि लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही अभियंते वसमत येथील आहेत.
नांदेडच्या लाच लुचपत विभागाने एका तक्रारदारे दिलेल्या तक्रारीनुसार घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी पंचायत समिती वसमत येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शेख समीर शेख खेसर(२६) आणि दुसरे अभियंता करीम कुरेशी शादुल्ला (२६) यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी दहा हजार रुपये लाच मागितली. या लाच मागणीची पडताळणी ३१ डिसेंबर २०२१ रोजी झाली. त्यात दुसरे अभियंता करीम कुरेशी हे पहिले अभियंता शेख समीर शेख खेसर यास लाच स्विकारण्यासाठी प्रोत्साहन देत होते. आज ११ मे रोजी पंचासमक्ष दहा हजार रुपयांची लाच स्विकारली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर, गणेश टाककोलुवार, सचिन गायकवाड, किशन चिंतोरे, मारोती मुलगीर, शेख मुजीब आणि गजानन राऊत यांनी पुर्ण केली.