नांदेड,(प्रतिनिधी)- धर्माबादच्या व्यापाऱ्यांचे तेलंगाणातील निझामाबाद येथील व्यापाऱ्यांनी ८३ लाख १० हजार ५८७ रुपये बुडवल्या प्रकरणी धर्माबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.धर्माबाद पोलिसांची एक टीम सध्या निझामाबाद मध्ये आहे.
दिनांक १० मे रोजी नागनाथ विठ्ठलराव कंदूरके रा.धर्माबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी १५ फेब्रुवारी २०२० ते ३ डिसेंबर २०२० दरम्यान शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हरभरा जिल्हा निझामाबाद तेलंगाणा राज्यातील मोहमंद असिफोद्दीन मोहंमद नसरुद्दीन यास धर्माबाद येथील मोहंमद रफी मो. बशीर यांच्या मार्फ़त विक्री केला. पण हरभऱ्याचे थकीत रुपये ८३ लाख १० हजार ५८७ मिळत नव्हते म्हणून नागनाथ कंदुरके यांनी अनेक चकरा निझामाबाद येथे मारल्या आणि अखेर तक्रार दिली.या बाबत धर्माबादचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलीस उप निरीक्षक पंतोजी आणि काही पोलीस अंमलदार निझामाबाद येथे आरोपीला पकडण्यासाठी गेले आहेत.