
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना विभाजन करणाऱ्या मांजरा नदीच्या पात्रतातून भरपूर वाळू उपसा होत असतो. काम कोणाचे आहे यावर अनेक प्रश्न चिन्ह या नदीघाटात कार्यवाही करण्याअगोदर केले जातात. महसुल विभागाकडून मिळालेल्या परवानगी व्यतिरिक्त लाखो ब्रास वाळू येथून उपसा केली जाते. बिलोली पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी आजची पहाट होण्याअगोदर मांजरा नदीच्या पात्रातून 38 वाहने आणि पाच पोकलॅंड जप्त करून एक मोठी धाडसी कार्यवाही केली आहे. या कार्यवाही करण्यात वाहन चालक, ठेकेदार, ठेकेदारांचे सहाय्यक यांना पळता भूईथोडी झाली होती.
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली उपविभागात सहा महिन्यापुर्वी सहाय्यक पोलीस अधिक्षक या पदावर अर्चित चांडक यांची नियुक्ती झाली. भारतीय पोलीस सेवेतून पद मिळवून आलेल्या अर्चित चांडक यांना नियुक्ती मिळाल्यानंतर बरेच महिने प्रशिक्षणात द्यावे लागले. त्यांनी आपले प्रशिक्षण पुर्ण करून बिलोली उपविभागात आता पुन्हा एकदा जोरदार कार्यवाही सुरू केली आहे.
मांजरा नदीच्या पात्रातून महसुल विभागाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त जास्तीचा वाळू उपसा होतो. मांजरा नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे महसुल प्रशासन आणि तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्याचे महसुल प्रशासन परवानगी देत असते. आपण दिलेल्या परवानगीवर योग्य देखरेख ठेवणे ही महसुल प्रशासनाचीच जबाबदारी असते. पण दोन राज्यांना विभाजित करणाऱ्या मांजरा नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध वाळु उपसावर कोणाचीही नजर नव्हती. किंबहुना दोन्ही राज्यातील महसुल प्रशासन याकडे कानाडोळा करत होते. या नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळु उपस्यासाठी असंख्य निवेदने, उपोषणे आदी लोकशाही मार्गांनी निषेध झाले होते. तरी पण अवैध वाळू उपसा मात्र सुरूच राहिला.
आज 15 मे ची पहाट होण्याअगोदर अर्चित चांडक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांजरा नदीपात्रात धाड टाकली तेंव्हा तेथे हजर असणारा प्रत्येक व्यक्ती सुसाट वेगाने पळत सुटला आपणच केलेल्या वाळू उपस्यातील खड्ड्यांमुळे त्यांच्या पळण्यात अनेक अडचणीपण निर्माण झाल्या. पण त्यांनी तेथून पळ काढण्यात यश मिळवले. पण आपली बरीच जंगम मालमत्ता ते सोडून गेले. अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणावरुन वाळूने भरलेले 38 टिपर आणि 5 वाळू उपसा करणारे पोकलेंड जप्त केले आहेत. सहसा वाळू उपसा करणाऱ्या पोकलेंडची किंमत 20 ते 30 लाख रुपये दरम्यान असते. तसेच टिपरची किंमत 10 ते 15 लाखांच्या आसपास असते. या दोन्ही संख्यांचा गुणाकार करण्याची कला आम्हाला जमली नाही. अवैध रित्या उपसा केलेली वाळू मोटार वाहन कायद्यातील सर्व सुचना धुडकावून जास्त भरलेली होती. अर्चित चांडक यांनी ही अवैध वाळू उपसा करणारी ऐवढी मोठी संपत्ती जप्त केली आहे. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालय बिलोली आणि मोटार परिवहन विभागाला देण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती. मागील तीन-चार वषार्ंच्या काळात मांजरा नदीच्या अवैध वाळू उपसावर ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे मानले जाते.
मांजरा नदी पात्रात धाड पण गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपस्यावर का नाही ?
मांजरा नदीच्या पात्रातील कार्यक्षेत्र सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याने येथे बरीच मोठी धाड टाकून अर्चित चांडक यांनी वाळू माफियांना चांगलाच मोठा झटका दिला. परंतू नांदेड जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी आणि त्यातून होणारा अवैध वाळू उपसा कोण थांबवणार ? अर्चित चांडक जिल्ह्यात कोठेही कार्यवाही करू शकतात परंतू त्यांना तसे आदेश कोण देणार असे अनेक प्रश्न मांजरा नदीतील अवैध वाळू उपस्यावर धाड टाकल्यानंतर समोर आले आहेत. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र जिल्हाधिकारी कार्यालयापासून अर्धा किलो मिटर एवढेच आहे. जिल्हाधिकारी हे नांदेड महसुल प्रशासनाचे प्रमुख आहेत. मग त्यांनी या बाबत कार्यवाही करावी आणि गोदावरी नदीत होणारा अवैध वाळू उपसा बंद करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.अवैध वाळू उपसा होणाऱ्या नद्यांवर नदी पाहणी करण्यासाठी पथके नियुक्त आहेत. त्या पथकांचे प्रमुख नियमित नदी पाहणी दौरे करीत असतात. त्यांनी आता तरी अर्चित चांडक यांच्या कार्यवाहीकडे लक्ष ठेवून स्वत: सुध्दा मर्दुंकी गाजवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.