नविन नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीचा गुन्हा फक्त १४ तासांनी दाखल करण्यात आला आहे. त्यात ५ लाख ३० हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे.
सय्यद अतिक सय्यद रशीद रा.एनडी ४ सिडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी ते आठवडी बाजारातील व्यवसायाची रक्कम रुपये ४ लाख ६० हजार घेऊन आपल्या दुचाकी गाडीवर बसून सिडको कडे अर्थात आपल्या घराकडे जात असतांना रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास वाजेगाव कापूस संशोधन केंद्राच्या गेट समोर त्यांच्या पाठमागून आलेल्या तीन अनोळखी दरोडेखोरांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गाडीला कट मारून पुढे गेले,अंगावर मिरचीची पूड टाकली.त्यांना त्या तीन दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील ४ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग आणि ७० हजारांची दुचाकी गाडी असा एकूण ५ लाख ३० हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे.त्या तीन दरोडेखोरांनी आपल्या चेहऱ्यावर कपडे बांधलेले होते.
नांदेड ग्रामीण हा गुन्हा दिनांक १६ मे २०२२ रोजी १२.४९ वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक १९ नुसार दाखल केला आहे.उशिराने कारण लिहिले की नाही याबाबत माहिती प्राप्त झाली नाही.भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२,३४ आणि हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार गुन्हा क्रमांक २८६/२०२२ दाखल केला आहे.नांदेड ग्रामीणचे अत्यंत शिस्तप्रिय,कणखर,मागील एक वर्षांपासून जास्त काळ तोंडी आदेशाने कार्यरत श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक महेश कोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सुनील गटलेवाड अधिक तपास करीत आहेत.