
नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दिनांक १७ मे च्या रात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन बंदुकी,चार जिवंत काडतुसे,दोन धारधार हत्यारे बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ दरोडेखोरांना पकडले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी लगेच पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना सविस्तर सादरीकरण करून आपले सहकारी पोलीस अधिकारी पांडुरंग भारती,पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे,सहायक पोलीस उप निरीक्षक गोविंद मुंढे,शाहू,पोलीस अंमलदार दशरथ जांभळीकर,मारोती तेलंगे,शंकर मैसनवाड,बालाजी तेलंग,विलास कदम,गणेश धुमाळ,तानाजी येळगे यांना मिळालेली माहिती प्रत्यक्षात आणण्यासाठी हस्सापूर शिवारात पाठवले.
हस्सापूर पूल ते भगतसिंघ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ५ जण दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या कमलेश उर्फ आशु पाटील बालाजी लिंबापुरे (२२) रा.गॅस गोडावून जवळ वसरणी नांदेड,श्याम मुंजाजी सोनटक्के (२२) रा.हनुमान मंदिराजवळ जुना कौठा नांदेड,शिवाजी उर्फ शिवा माधवराव थेटे (२३),रा.टाकळगाव ता.लोहा जि.नांदेड, काळेश्वर रावण जाधव (२५) रा.गणपती मंदिराजवळ असर्जन नांदेड ,दीपक उर्फ वाघू भुजंग बुचाले (३५) रा.अवई ता.पूर्णा जि.परभणी असे ५ जण पकडले.
पोलीस पथकाने या पाच दरोडेखोरांकडून दोन बंदुकी, चार जिवंत काडतुसे,दोन धारदार शस्त्रे,पाच मोबाईल,एक दोरी असे एकूण ७० हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३९९,४०१,४०२ आणि हत्यार कायद्याच्या कलम ३/२५,४/२५,६/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.