नांदेड (प्रतिनिधी)- अवैध आणि हातभट्टीची दारु विक्री करण्याची अनेक प्रकरणे प्रलंबित असतांना उमरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. धपाटे यांनी अशा १३ प्रकरणांचा निकाल एकाच झटक्यात लावला आणि १३ गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी २५ हजार रुपये असा एकूण ३ लाख २५ हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास गावठी दारू विक्रेत्यांना सहा महिने तुरूंगात राहावे लागेल असा आदेश देण्यात आला आहे.
उमरी न्यायालयात उमरी पोलीसांनी दाखल केलेली महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (ई) आणि कलम ६५ (एफ) ही एकूण १३ प्रकरणे अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या प्रकरणांमध्ये लक्ष्मण दाराम हिवराळे, शिवाजी माधव दंतलवाड, गणेश पोमा चव्हाण, शिवराम चव्हाण, माधव चंदर सावंत, विशाल शांतवन रणवरे, दिलीप चंदर सावंत, रमेश शामराव चव्हाण, गंगाधर विश्वनाथ कटकदवणे, निलाबाई परसराम राठोड, लक्ष्मण राजाराम धनवे आणि साईनाथ बीरेवार असे १२ आरोपी होते. महाराष्ट्र दारु बंदी कायद्याची अशी १३ प्रकरणे होती. ज्यामध्ये एक जण दोन गुन्ह्यांमध्ये सामील होते. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली ही प्रकरणे उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सुगावे, कंधारे, भोसले यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा करून न्यायालयासमक्ष सरकारी वकील अॅड. जाधव यांच्यावतीने सादरीकरण केले. न्यायालयासमक्ष आलेला पुरावा आणि गावठी दारु संदर्भाचा न्यायवैधक प्रयोग शाळेचा अहवाल ग्राह मानून न्यायाधीश एस. एस. धपाटे यांनी १३ गुन्ह्यांमध्ये गावठी दारु विकणाऱ्या १२ जणांना प्रत्येकी २५ हजार रुपये असा एकूण ३ लाख २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील १२ पैकी १ आरोपी दोन गुन्ह्यांचा भागिदार असल्याने त्याला ५० हजार रुपये भरावे लागणार आहेत. न्यायाधीश एस. एस. धपाटे यांनी यापूर्वी सुध्दा गावठी दारु विक्रेत्यांना असाच भरघोस दंड ठोठावलेला आहे.