नांदेड(प्रतिनिधी)-दि.17 मे रोजी उस्माननगर येथे उदासी चौक भागात धार्मिक बॅनरची विटंबना करणाऱ्या धनंजय गुणाजी घोरबांडला उस्माननगर पोलीसांनी वाशी, मुंबई येथून पकडून आणले आहे. कंधार न्यायालयाने धनंजय घोरबांडला चार दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे.
दि.17 मे रोजी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 96/2022 दाखल झाला. प्रकरण उदासी चौक उस्माननगर येथे घडले होते. एका धार्मिक बॅनरची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. याबाबत उस्माननगर पोलीस ठाण्यात शिवप्रसाद जगन्नाथ साखरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. मुळ प्रकार 16 मे च्या रात्रीपासूनच घडलेला होता. जनतेने या धार्मिक विटंबना प्रकरणी उदासी चौकात रस्ता रोको केला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणी ही विटंबना घडवली त्याला शोधले. दरम्यान तो मुंबईला पळून गेला होता. पोलीस उपनिरिक्षक सुनिल पल्लेवाड, पोलीस अंमलदार भारती, बालाजी राठोड यांचे पथक मुंबईला गेले आणि त्यांनी तेथून धनंजय गुणाजी घोरबांड (28) रा.उस्माननगर यास पकडून आणले. यापुर्वी सुध्दा 8 मे 2022 रोजी असाच विटंबनेचा प्रकार घडला होता. तो गुन्हा सुध्दा उस्माननगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते यांनी दिलेल्या माहिती नुसार धनंजय गुणाजी घोरबांड हा नामांकित व्यक्ती आहे. त्याच्याविरुध्द जीवघेणा हल्ला, सरकारी कामात अडथळा अशा स्वरुपाचे गुन्हे यापुर्वी सुध्दा दाखल आहेत.
उस्माननगर पोलीसांनी धनंजय गुणाजी घोरबांडला आज कंधार न्यायालयात हजर केले. कंधार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी धनंजय गुणाजी घोरबंाडला चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
धार्मिक विटंबनेचा प्रकार लवकर उघडकीस आणून आरोपीला गजाआड करणाऱ्या उस्माननगर पोलीसांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले आहे.