583 दिवसांची सिक रजा विशेष विकलांगता रजा म्हणून मंजूर होते

नांदेड(प्रतिनिधी) – पोलीस अंमलदारांनो आपल्याला हे माहित आहे काय एका पोलीस अंमलदाराची 583 दिवसाचा आजारी कालावधी (रजा) विशेष विकलांगता रजा या स्वरुपात मंजुर झाला आहे. हा भाग महाराष्ट्र नागरी सेवा सेवा (रजा) नियम 1981 प्रमाणे मंजुर करण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे एखादा पोलीस अंमलदार आजारी रजेवर गेला तर तो परत आल्यानंतर त्याची आजारी रजा ही परावर्तीत रजेचा अर्ज घेवून बदलली जाते. त्यानुसार अंमलदार अर्ज देतात आणि त्यांच्या जमा रजेतून आजारी कालावधी रजेत परावर्तीत केला जातो. भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्ष पुर्ण झाली आहेत. आजही हाच प्रकार चालू आहे. तोंड दाबून बुक्यांचा मार अशी एक म्हण पोलीस दलात प्रसिध्द आहे. असाच कांहीसा भाग रजेच्या संदर्भाने अंमलात येतो. एखाद्या पोलीस अंमलदाराला आजारी रजेवर जायचे असेल तर त्याला सिकमेमो घ्यावा लागतो आणि त्यानंतरच तो रजेवर जावू शकतो, उपचार घेवू शकतो, रजा संपल्यावर परत आला तर त्याला वेगवेगळ्या विविध प्रक्रियांमधून जावे लागते आणि मग त्याचा रजा मंजुरीचा भाग पुर्ण होतो. अशा दिव्यातून आपली प्रक्रिया पुर्ण करणाऱ्या एका पोलीस अंमलदारांना औरंगाबाद पोलीस पथकाचे विशेष पोलीस महानिरिक्षकांनी दिलासा दिला आहे.
उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस अंमलदार बी.एन.कांबळे हे 20 जानेवारी 2019 रोजी आजारी रजेवर गेले होते. ते रजेवरून परत 25 ऑगस्ट 2021 रोजी परत आले त्यांचा हा एकूण कालावधी 583 दिवसांचा होत आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात त्यांना याबद्दल काहीच दिलासा मिळाला नाही म्हणून औरंगाबाद पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे अपील सादर केले. या अपील प्रकरणाचा निकाल देतांना औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांनी महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील नियम क्रमांक 75 नुसार व उपनियम 6 व 7 (ए) व (बी) मधील तरतूदींच्या आधारे पोलीस अंमलदार बी.एम.कांबळे यांना 583 दिवसांचा आजारी कालावधी विशेष विकलांगता रजा या सदरात मंजुर केला आहे.
1981 पासुन लागू असलेल्या नागरी सेवांचा आधार बी.एन.कांबळे यांना मिळाला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात आपले अश्रुगाळत अनेक पोलीस अंमलदार आपली आजारी रजा मंजुर करून घेण्यासाठी धडपड करत असता परंतू त्यांच्या त्या रजांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना किती उंबरठे झिजवावे लागतात याची कल्पना फक्त त्यांनाच आहे. बातमीत प्रसिध्द केलेला आदेश हा औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांचा असला तरी त्याला आधार महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील नियम क्रमांक 75 नुसार व उपनियम 5 व 7 (ए)व (बी) मधील तरतूदींनुसार देण्यात आलेला आहे. अर्थात हा नियम राज्यातील सर्व पोलीस अंमलदारांना सुध्दा लागू आहे. याची माहिती सर्व पोलीस अंमलदारांनी ठेवावी. विशेष पोलीस महानिरिक्षक औरंगाबाद कार्यालयाने दिलेल्या या आदेशाचा क्रमांक जा.क्रं.प्रलि आस्था-2/सपोफौ-288/ विशेष रजा / 2022 /2500 दि.22/04/2022 असा आहे.