नांदेड(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये अनेकांना सबसे सस्ता डॉट कॉम या संकेतस्थळावरून फसवणूक करून 89 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीला नांदेड जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेने बिहार राज्यातून पकडून आणल्यानंतर न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सन 2020 मध्ये शुभम भुमेरा पामलुलू यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीची दुकान आहे. या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी सबसे सस्ता डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि मोबाईल खरेदी केले. त्यांच्यासोबत इतरांनी सुध्दा या सबसे सस्ता डॉट कॉममध्ये पैसे गुंतवले ही रक्कम एकूण 89 लाख रुपये आहे. या प्रकरणात शुभम पामलुलू यांनी दिलेल्या तक्रारीत 4 नावे होती. त्यातील दोघांना नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेने अगोदरच पकडले होते. पण या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार, सबसे सस्ता डॉट कॉम बनवणारा मास्टर माईंड मात्र सापडला नव्हता. नांदेड जिल्ह्यातील आर्थिक गुन्हा शाखेकडे या प्रकरणाचा तपास होता. सध्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार यांना आपल्या पोलीस अंमलदारांसह तिसरा मुख्य आरोपी शोधण्यासाठी पाठविण्यात आले तेंव्हा या पोलीस पथकाने देहरी आनसुल जि.रोहतास (बिहार) येथून देशपाल श्रीवास्तव (34) यास पकडून आणले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार देशपाल श्रीवास्तव हाच तक्रारीमधील सुशांत घोष आहे अशी माहिती समोर आली. सुशांत घोषच्या नावावरच मी सबसे सस्ता डॉट कॉम हे संकेतस्थळ बनविल्याची कबुली देशपाल श्रीवास्तवने दिली आहे. नांदेडला आणल्यानंतर न्यायालयाने देशपाल श्रीवास्तवला पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दोन वर्षापासून 89 लाखांची ठकबाजी करून फरार असलेल्या आरोपीला गजाआड करणाऱ्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलीसांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी कौतुक केले आहे.