नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख अत्यंत खालच्या स्तरावरील शब्दात शिवीगाळ करत असून जिवे मारण्याची धमकी देत आहेत असे निवेदन शर्मा ट्रॅव्हल्सचे मालक अनिल मोहनलाल व्यास (शर्मा) यांनी पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य , आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिले आहे.
नांदेड शहरात शर्मा ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसाय चालवणारे अनिल मोहनलाल व्यास (शर्मा) यांनी 20 मे रोजी दिलेल्या निवेदनानुसार दि.4 एप्रिल 2022 रोजी माझे व्यवस्थापक माणिक सूर्यवंशी यांना मोबाईल क्रमांक 9765390333 यावरून कॉल आला. मी शहर उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख बोलतो मला लातूरसाठी तिकिट ठेव. तेंव्हा व्यवस्थापक माणिक सूर्यवंशीने दोन दिवसानंतर फोन करा आपले तिकिट ठेवतो कारण आज तिकिट दिले तर माझे गोव्याचे तिकिट खराब होते. त्यावर चंद्रसेन देशमुख यांनी कोणाला नाही म्हणतोस, … भरली का, तुझा मालक कोठे आहे, मला ओळखत नाही काय, चुपचाप तिकिट ठेव नाही तर तुला जिवे मारतो अशी धमकी दिली. या सर्व बोलण्याचे रेकॉर्डींग मी ऐकले आहे तरी त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर मला 9922530530 वर फोन आला. मी फोन उचलला तेंव्हा ऐकेरी भाषेत बोलत अत्यंत घाणेरडी शिवीगाळ करत चंद्रसेन देशमुख यांनी मला तु ट्रॅव्हल्सचा धंदा कसा करतोस ते बघतो. धंदा निट करायचा असेल तर मला 20 हजार हप्ता दे नाही तर धंदा बंद करतो असे सांगितले. दि.26 एप्रिल रोजी नमस्कार चौकात माझ्या ट्रॅव्हल्स गाडीने अपघात झाला. ती गाडी परत मिळविण्यासाठी मी न्यायालयात अर्ज केला. तरी पण मला ती गाडी लवकर मिळू नये असे सर्व प्रयत्न चंद्रसेन देशमुख यांनी केले. दि.5 जुलै 2021 रोजी माझ्या गाडीतून अनाधिकृत वॉटर सॉफ्टनर आणल्याबाबत मीच वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या प्रकरणात आपल्या पदाचा गैरउपयोग करून तपासीक अंमलदारावर दबाव आणून माझ्याविरुध्दच 285 ही भारतीय दंड संहितेचे कलम जोडून गुन्हा दाखल करायला लावला.
यापुर्वी सुध्दा पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी त्यांच्यज्ञा पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून माझ्या ट्रॅव्हल्सने बिना मोबदला प्रवास केला आहे. नांदेड-लातूर गाडीत बिना मोबदला तिकिट बुक न केल्याने आणि त्यांच्या मागणीप्रमाणे 20 हजार रुपये हप्ता न दिल्याने आता ते मला जाणूनबूजून, सुडबुध्दीने, त्यांच्या वर्दीचा, पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास देत आहेत. महाराष्ट्राच्या राज्यभर व परराज्यात सुध्दा माझा व्यवसाय पसरलेला आहे. चंद्रसेन देशमुखमुळे मला धोका निर्माण झाला आहे. मी उच्च रक्तदाब व इतर आजारांनी त्रस्त आहे. त्यामुळे माझ्या जिविताचे कांही बरे वाईट झाल्यास त्यास चंद्रसेन देशमुख जबाबदार असतील. देशमुखकडून माझे व माझ्या परिवाराचे संरक्षण करावे आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी. शहरातील अनेक प्रतिष्ठीत नागरीकांना अपमानास्पद वागणूक देवून चंद्रसेन देशमुख आपला स्वार्थ साध्य करत आहेत. असे निवेदनात लिहिले आहे.
आजच पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी नांदेड शहरातील चार पोलीस निरिक्षकांची हजेरी सायंकाळी 7 वाजता आपल्या कार्यालयात लावली होती. त्याचे काय झाले हे कळले नाही. पण आता अनिल शर्मा यांनी गृहमंत्र्यांकडे आपली तक्रार पाठवली आहे. या तक्रारीची चौकशी कोण करील हाही प्रश्न आहे. यापुर्वीची सुध्दा एक चौकशी प्रलंबित आहे.