सगरोळी वाळू घाटात झालेला चिखल आता ओदशांमध्ये स्पष्टपणे दिसतो

नांदेड(प्रतिनिधी)-सगरोळी रेती घाटामध्ये झालेला चिखल दुरूस्त करण्याच्या प्रयत्नात बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दोन वेगवेगळे नवीन आदेश करून दोन जेसीबी मालकांकडून 7 लाख 50 हजार रुपये दंडाची रक्कम म्हणून जमा करून घेण्याचे आदेश तहसीलदार बिलोली यांना दिले. या आदेशाची माहिती नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुध्दा पाठवली. पण या दोन आदेशांचे अवलोकन केले असता वाळूमध्ये झालेला चिखल जास्तच वाढल्याचे दिसते. वाळूमध्ये चिखल होतो. ही नवीन सुंदर संकल्पना या निमित्ताने समोर आली.
15 मे रोजी बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी 38 ट्रक आणि 5 जेसीबी सगरोळी वाळू घाट क्रमांक 2 येथे पकडले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वाळूकंत्राटदाराचा खुलासा घेण्यात आला. पोलीसांनी 15 मे रोजी अहवाल दिला तर वाळू ठेकेदाराचा खुलासा 13 मे रोजी घेण्यात आला. हा दोन तारखांमधील चिखल कोणी बनवला. त्यानंतर 18 मे रोजी अत्यंत विद्युतगतीने काम करत बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सन्माननिय श्री.सचिनजी गिरी साहेब यांनी 38 ट्रक आणि 5 जेसीबी सोडून देण्याचे आदेश दिले. त्यामध्ये एक ट्रक बिना नोंदणीचा सुध्दा होता.सचिन गिरी यांनी केलेली उत्कृष्ट आणि दमदार कामगिरी प्रसारमाध्यमांनी अत्यंत मांडणीपुर्ण शब्दात जनतेसमोर आणली. त्यानंतर 20 मे रोजी दोन विविध आदेश पारीत झाले. ते सुध्दा गजब आहेत. दोन्ही आदेशांवर टंकलिखित तारीख 18 मे आहे अर्थात त्याच दिवशी ते आदेश टंकलिखीत झाले. ज्या दिवशी गाड्या व जेसीबी सोडल्या. परंतू या दोन आदेशांमध्ये जावक क्रमांक 684 वर 20 मे 2022 अशी तारीख हाताने लिहिलेली आहे. तसेच दुसऱ्या आदेशावर जावक क्रमांक 679 तारीख 19 मे 2022 अशी हाताने लिहिलेली आहे.
गाड्या सोडण्याचा आदेश आणि त्याचा खुलासा रेती घाट धारक शेख अलीम अमीर साब रा.अटकळी यांनी दिला होता. त्याची तारीख या नवीन आदेशात 17 मे 2022 अशी लिहिली आहे. तसेच दुसरा जेसीबी मालक गणेश रमेश पामु रा.निजामाबाद हा आहे. त्यांचा खुलासा 13 मे 2022 रोजी प्राप्त झाला असे या नवीन आदेशात लिहिले आहे. महसुल खाते सैल असा एक वाकप्रचार प्रचलित आहे. पण त्या खात्यातील सैलता किती असावी याचा विचार केला तर आणि या आदेशांचे अवलोकन केले तर वाळूमध्ये झालेला चिखल काही चुकीचा नव्हता असेच म्हणावे लागेल. गाड्या सोडण्याचा आदेश केला तेंव्हा त्यामध्ये पाच जेसीबी असतांना 4 जेसीबी सोडण्याचा आदेश केला. त्यानंतर त्याच दिवशी केलेल्या आदेशात शेख अलीम अमीर साब आणि गणेश रमेश पामू यांना अवैध वाळू उत्खन्न करतांना पकडण्यात आले आणि त्यावेळी अर्चित चांडक ने हे जेसीबी पकडले होते असे लिहिले आहे. नवीन आदेशामध्ये रमेश गणेश पामु हे कोणते घाटधारक आहेत याचा कांही एक उल्लेख केलेला नाही. मग तो व्यक्ती घाटधारक नसतांना त्याचा मालकीचा जेसीबी कोणी आणला याचाही उल्लेख या आदेशामध्ये नाही.
गाड्या सोडतांनाच्या आदेशामध्ये उपविभागीय अधिकारी सचिन गिरी साहेबांना अवैध वाळू उत्खनन दिसले नाही आणि गणेश रमेश पामू आणि शेख अलीम अमीर साब या दोघांना अवैध उत्खननासाठी जेसीबी वापरले म्हणून प्रत्येकी 7 लाख 50 हजार असा 15 लाख रुपये दंड ठोठावला. या आदेशानुसार प्रश्न असाही आहे की, निजामाबादमधील गणेश रमेश पालू यांच्याकडून 7 लाख 50 हजारांची वसुली करण्याची जबाबदारी बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यावर ठेवण्यात आली आहे. जेसीबी तर अगोदर सोडून दिले मग आता 7 लाख 50 हजारांची वसुली निजामाबादमध्ये जावून तहसीलदार श्रीकांत निळे हे कसे करतील हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने चिखलात बुडाला आहे.
वाळू घाटावर साचलेला चिखल आदेशामध्ये सुध्दा दिसायला लागला आहे. एका आदेशात अवैध वाळू उत्खनन होतच नव्हती आणि दुसरा आदेशात पाच पैकी दोन जेसीबी अवैध वाळू उत्खनन करत होते. गाड्या आणि जेसीबी सोडण्याच्या आदेशात चार जेसीबींचा उल्लेख आहे मग ते जेसीबी पाणी पाहायला आले होते काय असे लिहिले तर काय चुक अशा प्रकारे सगरोळी वाळू घाटात झालेल्या अवैध रेती उत्खननाच्या कार्यवाहीमध्ये पुढे चिखलाचा डोंगर तयार झाल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *