ट्रॅव्हल्स मालक अनिल शर्माच्या अर्जाविरुध्द पोलीस उपअधिक्षक देशमुख यांचा गुन्ह्याच्या रुपाने प्रतिहल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-ट्रॅव्हल्स मालक अनिल शर्माने पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी मला 20 हजार रुपये हप्ता मागितला अशा स्वरुपाचा अर्ज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर एका आदेशानुसार चंद्रसेन देशमुख यांनी वजिराबादच्या पोलीस निरिक्षकांचे नाव लिहुन अनिल शर्माविरुध्द नवीन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत आणि प्रथम खबरी अहवालाची प्रत आम्हाला त्वरीत सादर करावी असे लिहिले आहे. यावरुन आता कोणी पोलीस अधिकाऱ्याविरुध्द तक्रार देऊ नका नाही तर गुन्हे दाखल होतील आणि नवीन काम लागेल,असेच म्हणावे लागेल.

शर्मा ट्रॅव्हल्सचे मालक अनिल मोहनलाल व्यास(शर्मा) यांनी 20 मे रोजी एक अर्ज पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र, पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिला. सोबतच त्याच्या प्रति ईमेलद्वारे, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुध्दा पाठवल्या. या अर्जात त्यांचे मॅनेजर माणिक सुर्यवंशीना फोनवरून चंद्रसेन देशमुख यांनी केलेली शिवीगाळ नमुद करण्यात आली आहे. सोबतच ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्यासाठी 20 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असा उल्लेख त्या अर्जात होता. दिलेल्या अर्जानुसार वास्तव न्युज लाईव्ह यांनी त्या बातमीला 20 मे रोजीच प्रसिध्दी दिली. दैनिक आनंद नगरीमध्ये हा विषय 21 मे रोजी छापून आला. सोबतच 22 मे रोजी सुध्दा कांही वर्तमानपत्रांमध्ये या विषयाला जागा देण्यात आली. आज दि.22 मे रोजी चंद्रसेन देशमुख यांनी काढलेला आदेश प्राप्त झाला आणि त्यासोबत त्यांनी दिलेली सरकारतर्फे फिर्यादीहोवून दिलेली तक्रार प्राप्त झाली. आदेशाचा जावक क्रमांक 2398 दि.21/05/2022 असा आहे. या आदेशात जगदीश राजन्ना भंडरवार पोलीस निरिक्षक व पो.स्टे.प्रभारी अधिकारी पो.स्टे.वजिराबाद नांदेड असे लिहुन त्यांना प्रत पाठवली आहे आणि आदेशात विषयात लिहिलेले नाव अनिल मोहनलाल व्यास (शर्मा) रा.कौठा यांच्याविरुध्द दखल पात्र गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचा आदेश आहे. या आदेशात पोलीस (अप्रितीची भावना चेतावणे)अधिनियम 1922 च्या कलम 3 प्रमाणे आणि सहकलम 177, 182, भारतीय दंडसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा आदेश लिहिलेला आहे.

या संदर्भाने कांही वकील मंडळींना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अप्रितीच्या भावनेमध्ये शिस्त पाळली नाही तर हे कलम पोलीसांविरुध्द सुध्दा वापरले जावू शकते. भारतीय दंड संहितेच्या कलम 177 मध्ये खोटी माहिती देणाऱ्याविरुध्द हे कलम वापरले जाते. तसेच कलम 182 मध्ये आपल्या कर्तव्याला योग्य न्याय न देणे, आपली जबाबदारी पार न पाडणे आणि जी माहिती दिली आहे. ती ज्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिली तो सरकारी अधिकारी त्यास खोटे समजत असेल तर हे कलम लावले जाते असे सांगितले.

या संदर्भाने अनिल शर्माचा अर्ज पाहिला असता त्या अर्जात सरकार विरुध्द तक्रार नाही. ती तक्रार पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन जगदेवराव देशमुख यांच्याविरुध्द आहे. पण चंद्रसेन देशमुख यांनी दिलेली तक्रार सरकारतर्फे फिर्यादी होवून दिलेली आहे. सोबतच अनिल मोहनलाल व्यास(शर्मा) यास मी व्यक्तीश: ओळखत नाही आणि वर्षभरात माझी कधी समक्ष भेट झालेली नाही असे लिहिले आहे. अनिल शर्माने दिलेले अर्ज त्यांच्याकडे आहेत. सोबतच 26 जून 2021 रोजी वॉटर स्वॉफ्टनर आणल्याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात देशमुख नांदेडला आल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर गुन्हा क्रमांक 143/2022 काही दिवसांपुर्वीच दाखल झालेला आहे. मुळात अनिल शर्मा यांचे कार्यालय आणि गाड्या थांबण्याची जागा अनुक्रमे इतवारा आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. मला माझे काम करता येवू नये म्हणून अनिल शर्माने माझ्याविरुध्द खोटा अर्ज दिला आहे असे चंद्रसेन देशमुख यांचे तक्रारीत म्हणणे आहे. सोबतच विरुध्द आणि पोलीस प्रशासनाविरुध्द तिरस्काराची भावना प्रसारीत करण्यासाठी वास्तव न्युज वेब पोर्टल, दैनिक आनंद नगरी यांना अर्जाच्या प्रतिदेवून तशा मजकुराच्या बातम्या छापून आणण्यासाठी दिल्या. त्या बातम्या छापून आलेले दि.21 मे रोजीचे वर्तमानपत्र तक्रारीसोबत जोडलेले आहेत. या संदर्भाने अनिल शर्मा यांच्याकडे विचारणा केली तेंव्हा मी दिलेल्या तक्रारीला काऊंटर करण्यासाठी देशमुख यांनी माझ्याविरुध्द अर्ज दिला असेल असे सांगितले. अनिल शर्मा विरुध्द 285 चा गुन्हा दाखल झाला. त्याबाबत 22 जून 2021 रोजी अनिल शर्मानेच त्याची पहिली तक्रार दिली होती. एखाद्या सर्व सामान्य माणसाला गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी किती काळ लागतो पण देशमुखांचा गुन्हा आदेशावर दाखल होतो आहे ना कमाल.

अशा प्रकारे एकंदरीत अनिल शर्माने दिलेला अर्ज आणि पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेला आदेश म्हणजे यानंतर सर्वसामान्य नागरीकांनी कोणी पोलीस चुकला असेल तरी त्याच्याविरुध्द तक्रार देवू नये जेणे करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होणार नाही असे लिहिले तर चुक ठरणार नाही. सध्या अनिल शर्मा विरुध्द नव्याने दाखल झालेला गुन्हा क्रमांक 170/2022 असा आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार हे करणार आहेत.

संबंधीत बातमी…..

https://vastavnewslive.com/2022/05/20/20-हजार-रुपये-हप्ता-मागणाऱ्/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *