सात चोऱ्यांमध्ये 5 लाख 56 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-सहा घरफोड्या आणि एक दुचाकी चोरी अशा 7 घटनांमध्ये 5 लाख 56 हजार 470 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
भागवत लक्ष्मण गंभीरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरपंचनगर नांदेड येथील त्यांचे घर बंद करून ते 19 मे रोजी बोधन येथे लग्न कार्यासाठी गेले असतांना 20 मे च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या काळात त्यांचे घर चोरट्यांनी फोडले. त्यातून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे आणि चांदीचे दागिणे असा 50 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
राजेंद्र शेषराव वानखेडे यांचे साई विजय ऍग्रो वेअर हाऊस करंजी ता.हिमायतनगर येथे आहे. 20-21 मेच्या रात्री त्या वेअर हाऊच्या कंपाऊंडची लोखंडी जाळी तोडून सोयाबिनचे 54 पोते, 2 लाख 81 हजार 400 रुपये किंमतीचे कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी वाहनात टाकून चोरून नेले आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील देशमुखगल्लीमध्ये राहणारे सदानंद अशोक लिंगमपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 मे रोजी दुपारी 2.30 ते 3 अशा अर्ध्यातासाच्या वेळेत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या अंगठ्या आणि 34 किलो गहु असा 40 हजार 850 रुपयांचा ऐवज कृष्णा अजय राजवाडे याने चोरल्याची तक्रारीत लिहिले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
शिवाजी गंगाराम कुडकेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे बाभळी ता.बिलोली येथील त्यांच्या घराची कडीकापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि 40 हजार रुपये रोख रक्कम आणि 50 हजारांचे सोन्याचे दागिणे असा 90 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक एम.झेड. सय्यद अधिक तपास करीत आहेत.
अनिल शामराव कांबळे यांचे देशी दारुचे भोकरफाट्यावरील दुकान 20-21 मेच्या रात्री भिंतफोडून काऊंटरमधील 2700 रुपये रोख रक्कम आणि देशी दारुच्या विविध बाटल्या 25 हजार 920 रुपयांच्या असा एकूण 28 हजार 620 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरिक्षक अशोक जाधव हे करत आहेत.
ओमकार मार्केट नायगाव येथील विजय शिवराम कानोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20-21 मे च्या रात्री त्यांच्या दुकानातील 45 हजार रुपये किंमतीचे बॉन्डींग वायर आणि एक हजार रुपये रोख असे साहित्य कोणी तरी चोरून नेले आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सांगवीकर अधिक तपास करीत आहेत.
कुंडलवाडी गावातून अहमद मोहियोद्दीन अल्लाबक्ष शेख यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.जी.8708 किंमत 20 हजार रुपये ही दि.20 मेच्या रात्री 8 ते 21 मेच्या पहाटे 6 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. कुंडलवाडी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बेग अधिक तपास करीत आहेेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *