नांदेड(प्रतिनिधी)-89 लाखाच्या मोबाईल घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेने पकडलेल्या व्यंकटेश्र्वरा मोबाईल शॉपीच्या मालकास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बडवे यांनी 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सन 2020 मध्ये नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात शुभम पामलुलूने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 89/2020 दाखल झाला होता.या प्रकरणाचा तपास नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला होता. त्या प्रकरणात तक्रारीनुसार जास्त किंमतीचे मोबाईल कमी किंमतीत देण्याचे आमिष होते. हे सर्व कामकाज सबसे सस्ता डॉट कॉम या संकेतस्थळावरून चालविण्यात आले होते. या डॉट कॉमचा चालक देशपाल दामोदरप्रसाद श्रीवास्तव हा होता. गुन्हा दाखल झाल्यावर तो पळून गेला. त्यानंतर पोलीसांनी शुभम सारंगधर आणि शिवशंकरप्रसाद या दोघांना अटक केली होती.
देशपाल श्रीवास्तवला पोलीसांनी बिहार राज्यातून पकडून आणले. न्यायालयाने त्यास 23 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविलेले आहे. या तपासादरम्यान आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदेड शहरातील आयटीआय जवळ असलेल्या व्यंकटेश्वरा मोबाईल शॉपीचे मालक संतोष गजानन बारडकर (43) यांना तपासासाठी नोटीस देवून बोलावले. दोन दिवस चाललेल्या तपासानंतर आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी संतोष बारडकरला काल दि.21 मे रोजी रात्री अटक केली.
आज दि.22 मे रोजी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी न्यायालयात केलेल्या सादरीकरणानुसार संतोष बारडकरच्या खात्यावर दोन वेगवेगळ्या वेळेत आणि अक्षरात 5 लाख 99 हजार 400 रुपये देशपाल श्रीवास्तवच्या खात्यातून वळती करण्यात आले होते. अगोदर पकडलेल्या शुभम सारंगधर जो संतोष बारडकर यांच्या दुकानात नोकर होता त्याच्या खात्यावर 29 लाख 81 हजार रुपये देशपालच्या खात्यातून वळती झालेले आहेत. संतोष बारडकरने सबसे सस्ता डॉटकॉमचे कामकाज चालविण्यासाठी देशपाल श्रीवास्तवला आपल्या दुकानात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला होता. तसेच त्या डॉटकॉमच्या माध्यमातून मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हमी दिली होती की, जर यात कांही गडबड झाली तर त्यासाठी मी जबाबदार आहे. या सर्व प्रकरणाच्या सविस्तर तपासासाठी संतोष बारडकरला पोलीस कोठडी द्या अशी मागणी करण्यात आली. युक्तीवाद ऐकल्यावर न्यायाधीश बडवे यांनी संतोष बारडकरला 3 दिवस अर्थात 25 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
89 लाखांच्या मोबाईल घोटाळा प्रकरणात संतोष बारडकरला पोलीस कोठडी