नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि पंजाबमध्ये पोलीसांना हवा असलेला आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा याच्याशी जवळीक असणारे आणि पंजाब तुरूंगात अंमलीपदार्थ प्रकरणात विश्रांती घेत असलेल्या दोन जणांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने सन 2019 च्या एका प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुद्दसर नदिम यांनी दोघांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड शहरातील बाफना टी पॉईंटजवळ घर असलेल्या इंद्रजितपालसिंघ प्रितमसिंघ भाटीया यांच्यावर दि.9 फेबु्रवारी 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता गोळीबार झाला. सुदैवाने गोळी जमीनीवर लागली आणि भाटीयांना काही इजा झाली नाही. हा प्रकार घडला तेंव्हा त्यांच्याकडून खंडणीची मागणी झाली होती. ती खंडणी रिंदाने मागितली आहे असे सांगितले होते. या प्रकरणी इतवारा पेालीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 273/2019 भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सह इतर कलमान्वये दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेने आजच्या अगोदर तीन जणांना अटक केली होती. सध्या ते तिघे जामीनीवर आहेत.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना तपासात निष्पन्न झालेल्या या प्रकरणात भाटीयावर झालेल्या गोळीबाराच्या दिवशी पंजाबमधील राजबिर नागरा आणि धर्मप्रित सहोता यांचा हातभार होता ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात एक पोलीस उपअधिक्षक, चार अधिकारी, पोलीस अंमलदारांचे मोठे पथक आणि जलद प्रतिसाद पथकाचे निवडक पोलीस अंमलदार यांना पंजाबला पाठवून न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून या गुन्ह्याचे आजचे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांनी पंजाब येथून राजबिरसिंघ संतोकसिंघ नागरा (29) रा.नाथपूर ता.बटाला जि.गुरदासपुर आणि धरमप्रित उर्फ धम्मे अजितसिंघ सहोता (27)रा.नवरंगके, ता.सियाल जि.फिरोजपूर या दोघांना नांदेडला आणले.
आज दि.23 मे रोजी या दोघांना नांदेडच्या न्यायालयात हजर करतांना पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, आशिष बोराटे यांच्यास असंख्य स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार, जलदप्रतिसाद पथकाचे जवान यांच्यासह अनेक गुप्तहेर पोलीस हजर होते. न्यायालयात पांडूरंग माने यांनी सादरीकरण केल्याप्रमाणे या आरोपींनी त्या दिवशी वापरलेला चाकू जप्त करणे आहे, व्हॉटऍप चॅटची सविस्तर माहिती घेणे आहे यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश मुद्दसर नदिम यांनी राजबिरसिंघ आणि धरमप्रित या दोघांना 26 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रिंदाच्या दोन साथीदारांना 2019 च्या एका गोळीबार प्रकरणात पोलीस कोठडी