नांदेड(प्रतिनिधी)-मच्छीमारांच्या मुळ व्यवसायावर अतिक्रमण करून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांनी मच्छीमार नसतांना एका तलावावर आपला दावा केल्यानंतर मुळ मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्याची घटना घडली आहे. स्थळ पाहणीनंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी चुकीच्या अहवालानुसार कार्यवाही केली. याविरोधात हे उपोषण सुरू आहे.
वाफनी ता.माहुर जि.नांदेड येथे तुळजाई भुजलाशय मच्छीमार सहकारी संस्था मर्यादीत अशी एक संस्था आहे. या संस्थेने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जलील पटेल यांच्याकडून चुकीची स्थळ पाहणी करून घेतली. त्या विरोधात मुळ मच्छीमार व्यवसायीकांनी या उपोषणाची सुरूवात केली आहे. मनीरामखेड पाटबंधारे तलावावर संत भिमाभोई भुजलाशय मच्छीमार सहकारी संस्था मर्या.वाफणी ता.माहुर यांनी या तलवात मच्छीमारी करण्याचा कंत्राट मिळविण्यासाठी अर्ज केला होता. या संदर्भाच्या स्थळ तपासणीमध्ये सहाय्यक आयुक्त जलील पटेल यांनी चुकीची स्थळ पाहणी करून अहवाल दिला. त्या विरोधात प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय लातूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नाही म्हणून मुळ मच्छीमार व्यवसाय असणाऱ्या लोकांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे.
आमरण उपोषण करणाऱ्यांनी बऱ्याच नवीन बाबी आल्या निवेदनात लिहिल्या आहेत. त्यामध्ये तुळजाई या संस्थेमध्ये बहुतेक प्रवर्तक हे श्रीमंत व अतिश्रीमंत आहेत. त्यांच्याकडे गावाची पाटीलकी असल्यामुळे ते मच्छीमार नाही, त्यांना मासेमारी करता येत नाही. या संस्थेमध्ये 20 सदस्य मराठा, 13 सदस्य माळी, 2 सदस्य ब्राम्हण, 1 सदस्य कुणबी आणि एक सदस्य बंजारी आहेत. हे सर्वच सदस्य क्रियाशील मच्छीमार नाहीत. या संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांचे कृषी सेवा केंद्र आहेत. ते प्रतिष्ठत व श्रीमंत व्यापारी आहेत. करदाते आहेत. सोबतच त्यांच्याविरुध्द सिंदखेड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा पण दाखल आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जलील पटेल यांनी अनेक त्रुटींसह आर्थिक व्यवहार करून यांना नाहरक प्रमाणपत्र दिले आहे.
आम्ही सर्व उपोषणकर्ते हे वंशपरंपरागत पध्दतीने मच्छीमार व्यवसायीक आहोत. आमच्याकडे दुसरा व्यवसाय नाही. 15 मार्च 2022 रोजी संत भीमाभोई या मच्छीमार संस्थेची स्थळ पाहणी झाली. त्याच दिवशी तुळजाई या मच्छीमार बोगस संस्थेची स्थळ पाहणी बोगस आहे. धनदांडग्यांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना साथ देणाऱ्या जलील पटेल यांची भुमिका संशयास्पद आहे. त्यांची चौकशी लाचलुचपत विभागाकडून व्हावी तसेच व्हिडीओ शुटींगद्वारे नव्याने स्थळ पाहणी करण्यात यावी त्यासाठी लागणारा खर्च आम्ही भोई समाजाकडून करण्यास तयार आहोत त्यासाठी न्याय मिळवून द्यावा असे या निवेदनात लिहिलेले आहे.
या निवेदनाच्या प्रति मत्स्य व्यवसाय मंत्री, मत्स व्यवसाय राज्यमंत्री, मत्स्य व्यवसाय आयुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था, पोलीस अधिक्षक नांदेड, पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत विभाग, पोलीस निरिक्षक वजिराबाद नांदेड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नांदेड आदींसह अनेकांना पाठविण्यात आल्या आहेत.
आज उपोषणाचा दुसरा दिवस असून ज्यांना मासेमारी काय याचे ज्ञान नसतांना त्या लोकांनी आपल्या बळावर, बेकायदेशीर पध्दतीने मिळवलेला मनीरामखेड पाटबंधारे तलवाचा ताबा मिळवून ज्यांचा व्यवसायच मासेमारी आहे त्यांच्यावर अन्याय केला आहे असे उपोषणकर्ते सांगत होते.
सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी मासेमारी करणाऱ्यांना सोडून धनदांडग्यांना दिला मासेमारीसाठी तलवाचा ताबा ; आमरण उपोषण