नवीन नांदेड(प्रतिनिधी)-25 मे रोजी सिडको भागातील भारतीय जनता पार्टीचे सक्रीय सदस्य डॉ.देवानंद जाजू यांचा मृतदेह त्यांच्या घरी सापडल्यानंतर डॉ.देवानंद जाजू यांची आत्महत्या या मथळ्याखाली आम्ही बातमी प्रसिध्द केली होती. देवानंद जाजू यांच्या वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती प्राप्त झाली. डॉ.देवानंद जाजू यांच्या कुटूंबियांना आम्ही लिहिल्या चुकीच्या मथळ्यासाठी झालेल्या त्रासासाठी आम्ही खेद व्यक्त करत आहोत.
सिडको परिसरात अनेक वर्षापासून डॉ.देवानंद जाजू रुग्ण सेवा देत होते. त्यांच्या पत्नी डॉ.सुरेखा जाजू या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत नगरसेवक होत्या. डॉ.देवानंद जाजू यांची सुध्दा भारतीय जनता पार्टीचे सक्रीय सदस्य म्हणून प्रसिध्दी होती. दि.24 मे रोजी एका कौटूंबिक कार्यक्रमातून देवानंद जाजू घरी आले 25 मे रोजी सकाळी दररोजप्रमाणे त्यांच्या रुग्णालयासमोर असलेल्या मेडीकल दुकानदारांने त्यांना कॉल केला पण त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलीसांना बोलावण्यात आले. देवानंद जाजू यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी झोप येण्यासाठी वैद्यकीय मंडळी देतात त्या गोळ्या सुध्दा होत्या. याप्रसंगी त्या ठिकाणी झालेल्या चर्चेनुसार ही आत्महत्या की हृदयविकाराचा झटका या चर्चेच्या आधारावर आम्ही सुध्दा सिडको येथील डॉ.देवानंद जाजू यांची आत्महत्या या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. नांदेड ग्रामीण पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला होता. त्यानंतर वैद्यकीय अहवालात डॉ.देवानंद जाजू यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे लिहिले आहे. आम्ही आमच्या बातमीमध्ये आत्महत्या की, हृदयविकाराचा झटका असे दोन्ही शब्द लिहिले होते. परंतू मथळा लिहितांना आत्महत्या या शब्दाचा वापर केला होता. आमच्या मथळ्यातील शब्दामुळे जाजू कुटूंबियांना झालेल्या त्रासासाठी आम्ही त्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करीत आहोत.
सिडको येथील डॉ.देवानंद जाजू यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने