म्हणतात ना खरे बोलणे कुणालाच पटत नाही, आणि खरं बोललं की पटकन मिरच्या झोंबतात मग ते आपल्या कुटुंबातील अगदी जिव्हाळ्याच्या सदस्याला देखील. वर्तमानात महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणाची अवस्था अगदी ” कद्दु डूब रहे है और पत्थर तैर रहे है” अशीच झाल्यासारखी जनमानसात स्पष्टच प्रतिक्रिया आहे. मला वर्तमानातील राजकीय व सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकावा वाटला. वर्तमानातील राज्याच्या राजकारणात विकास व जनकल्याणावर चर्चा होण्या ऎवजी बहुतांश सत्ताधारी व विरोधक राजकीय पुढारी एकमेकांची उणी-दुणी काढणे, खालच्या थराला जाऊन आपापसातील टिंगल टवाळी करून एकमेकांवर चिखल फेक करण्यातच जास्त मग्न असल्याचे चित्र स्पष्ट आहे. राजकारण व समाजकारणात जनहित व विकासात्मक बाबींवर भाष्य करण्या ऐवजी आपापसात चिखलफेक करण्यातच ही मंडळी तरबेज वाटतात. आपण जनतेचे प्रतिनिधित्व करतो आणि संसद वा विधिमंडळासारख्या देवालयात असे कसे बोलतो, वागतो याचे अजिबात तारतम्य यांच्या अंगी दिसत नाही. वादविवाद जरूर असावेत पण त्याचा स्तर घसारता कामा नये याचे साधे भानही या मंडळीला नाही ही फार मोठी आपल्या देशातील लोकशाहीची विटंबना म्हणावयास वावगे नाही. कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी किती काळ राजकारण व समाजकारणात राहावे याचे कुठेच लिखित संकेत नसल्यामुळे ही सर्वच मंडळी शेवटच्या श्वासापर्यंत पिढ्यानपिढ्या गुळाच्या ढेपिला मुंगळे चिकटल्यासारखे घराणेशाहीचे राजकारण करून कायम राजकारणात गुंतलेले असतात. पूर्वी राजकारण व समाजकारण ही सेवा असायची, पण आज या सेवेचे रूपांतर धंद्यात झालेले आहे. जसे व्यवसाईक सर्वत्र आपल्या फायद्याचे बघतो तसेच राजकारण्यांचे झाले आहे. वर्तमानातील राजकारण व समाजकारण हे सेवाधारी नसून व्यवसायधारी झाल्यामुळेच घराणेशाहीचा उदय झालेला आहे. हे सर्व नक्कीच कुठेतरी थांबले पाहिजे असे जनाधारावरून स्पष्ट होते. वर्तमानातील राजकारण म्हणजे “जरर्र है तो जोर है।” जरर्र म्हणजे पैसा आणि जोर म्हणजे दबाव. पैश्याच्या जोरावर सर्वच स्तरावर धुमाकूळ घालून जनहिताची व विकासाची ऎशी की तैशी करून कायम मरेपर्यंत खुर्चीला चिकटून राहायचे आणि जनतेला विकास व कल्याणाचे गाजर दाखवायचे हीच सर्वत्र राजकीय पुढाऱ्यांची अवस्था आहे.
मला स्पष्टपणे म्हणावेसे वाटते की, आपल्या भारतात लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य शिल्लक आहे की नाही हा मोठा गंभीर व विचाराजोगाच प्रश्न आहे. आमचे घटनाकार वरून म्हणत असतील “जगाला मानवता, लोकशाही व लोकस्वातंत्र्यासह व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार उगाचच दिला कारण आज स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य राहिले नसून स्वैराचारी झाल्यासारखे दिसते. अशा अमर्याद स्वातंत्र्याला कुठे तरी कायद्याचा कडक धाक निश्चितच असला पाहिजे. अन्यथा अमर्याद स्वातंत्र्य उपभोगण्यामुळे समाज व देशात बेबंदशाही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नेमकी अशीच अवस्था देशासह महाराष्ट्राच्या राजकारणाचीही झालेली स्पष्टच जाणवते. मागच्या पंधरवाड्यापासून सोशल व प्रिंट मीडियावर काही कवितारुपी ओळी खूपच गाजत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासह समाजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले आहे. बुद्धीने परिपक्व असणाऱ्या माणसांनी कुठे काय बोलावे व काय बोलू नये याचे अजिबात भान वर्तमानातील राजकारणी माणसाला राहिलेले नाही याचे हे उत्तम उदाहरण होय. देशाचा, राज्याचा समाज असो की आपल्या कुटुंबातील वडीलधारी अथवा सर्वोच्च पदी विराजमान असलेली अथवा राहिलेली कुणीही कुठलीही व्यक्ती असो त्यांना क्लेशदायी होईल असे अथवा समाजात त्यांची विटंबना किंवा अवहेलना होईल असे कुणीही वागू नये.कुठलेही घृणास्पद शब्दोच्चारण कुणीही करू नये एवढे बुद्धी तारतम्य अथवा ज्ञान सर्वानाच असणे अत्यंत गरजेचे आहे. पण वर्तमानात असे घडत नाही, उठसुठ कुणीही एकमेकांच्या विरोधात विकृत टिंगलटवाळी करत असल्याचे स्पष्ट आहे. यात राजकारणी लोक विशेषतः अग्रेसर आहेत. याचेच अनुकरण सर्वसामान्य जनता करत असल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत अनुकरणाची प्रक्रिया प्रामुख्याने राजकारणी लोकांपासून जनतेपर्यंत अधिकच तीव्रतेने पोहोंचत आहे. सामान्य माणसे याचे प्रामुख्याने अनुकरण करत असल्याचे स्पष्ट जाणवते जे समाज व स्वहितासाठी अतिशय लाजिरवाणे आहे. याचा दुसऱ्या बाजूने विचार केल्यास वयस्क व बुद्धिवंतांनी अशा गोष्टींचा फारसा विचार न करणे बरे पण स्तुतीपाठकाच्या गराड्यात अडकलेल्या राजकारणी व्यक्तिमत्वाने आपली वैचारिक पातळी घसरू देऊ नये हे सुज्ञ व अनुभवी व्यक्तींचे काम असते. समाज अथवा राजकारणात कार्यरत असतांना चांगले करूनही निंदा नालस्ती ही होतच असते पण निंदा-नालस्ती होऊ नये असे राजकीय मंडळींनी वागूही नये. स्वतःला ज्येष्ठ व अनुभवी समजणाऱ्यानी या गोष्टीचे भान ठेवणे गरजेचे आहे पण वर्तमान राजकारणी लोकांबाबत स्वतः डोळस होऊन बाजूला राहणे अपवादानेच दिसते. आता तर राजकारणी मंडळी सामान्य बुद्धीहीन माणसाप्रमाणे अतिशय खालच्या थराला जाऊन आपापसात एकमेकांची उणी-दुणी काढून, निंदा-नालस्ती करून अतिशय हीन दर्जाचे भाष्य करून प्रत्यक्षात तसे वर्तन ही करत असल्याचे सर्वज्ञात आहे. असे वर्तन व विचार संस्कार हीन तर आहेतच पण समाजासाठी अनुकरणीय अजिबात नाहीत याचा अशा मंडळींनी बुद्धिप्रामान्याने व संवेदनशीलतेने विचार करणे योग्य होईल. एकीकडे महिलांच्या संरक्षण व सन्मानाच्या वल्गना करायच्या व कुणीतरी पोरकट स्त्री ने आपल्या विरोधात भाष्य केले म्हणून प्रशासनाचा दबाव तंत्राने वापर करून स्तुतीपाठकांन्वये कायद्याचा बडगा उभारून तुरुंगात डांबायचे याला स्त्री स्वातंत्र्य कुठे म्हणायचे, कुठे राहिले भाषण व व्यक्ती स्वातंत्र्य कुठे राहिली महिलांच्या मानसन्माची चाड?.? आजकाल तर सोशल मीडियामुळे उठसूट कुणीही ऐरे-गैरे चक्क महिलांचेच काय पण देशाच्या उच्छपदस्थांवर ही अशी वाह्यात, अश्लील टिंगलटवाळी करतात मग काय त्यांनाही तुम्ही तुरुंगाची हवा दाखवणार काय?.? एकंदरीत देशासह आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात भान हरपलेल्या बुद्धीहीन राजकारणी मंडळीला उत आला असून त्यांचे बरेवाईट कार्यकर्तृत्वावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी व टिंगलटवाळी करत आहेत हे मुळातच चूक व निंदनीय असून शहाण्या राजकारण्यांनी याचा फारसा विचार न करता वयोपरत्वे आपणच राजकीय संन्यास घ्यावा असेच जनतेला वाटत आहे.
*”चुकीचे समर्थन कुणीही करू नये, पण आपण कुठे चुकत आहोत याचे आत्मपरीक्षण मात्र सर्वांनीच जरूर करावे”*
म्हणूनच पुन्हा *”सच बोलना भी कलियुग मे एक बडी तपस्या है”* असेच वाटते.
*जय हिंद । इन्कलाब जिंदाबाद । लाल सलाम*
कॉम्रेड के के जांबकर
८२०८९३८८६५
