नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील एका गोडाऊनमध्ये सापडलेले बोगस बियाणेबाबत तालुका कृषी अधिकाऱ्याने संजय भारतीया, दिपक शिंदे आणि प्रदिप देशमुख अशा तीन आरोपींच्या नावासह दिलेल्या तक्रारीनंतर अर्धापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अर्धापूर येथील कृषी अधिकारी अनिल लक्ष्मणराव शिरफुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मे रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास मौजे पिंपळगाव (महादेव) शिवारात असलेल्या गोदामची तपासणी केली तेंव्हा शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या दुष्ट हेतूने त्या ठिकाणी अवैधरित्या शेतीसाठी उपयोगी अनेक बियाणे तयार केली जात होती. या गोदाममध्ये बुलेट ऍग्री प्रोडेक्ट आणि मयुरी सिड्स या दोन कंपन्यांच्यावतीने बोगस बियाणे तयार केली जात होती. अनिल शिरफुले यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संजय भारतीया,दिपक शिंदे आणि प्रदीप देशमुख अशा तीन जणांची नावे आरोपीच्या रकाण्यात लिहिलेली आहेत. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 139/2022 बियाणे कायदा 1968 च्या कलम 7 (ए), 8, 38, बियाणे नियंत्रण आदेश 1938 च्या खंड 3 आणि 18 तसेच जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 च्या कलम 3 आणि 7 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 463, 468 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.
बनावट बियाणे बनवणाऱ्यामध्ये संजय भारतीया, दिपक शिंदे आणि प्रदीप देशमुख सामील