
नांदेड(प्रतिनिधी)-माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश करून एका 18 वर्षीय युवकाने त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका कामगाराला मारहाण केली. याबाबत शिवाजीनगर पोलीसांनी त्वरीत हालचाल करून त्या युवकाला बनावटी, खेळण्याच्या पिस्तुलसह अटक केली आहे. कायदेशीर कार्यवाही सुरू वृत्त लिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक युवक माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरात आला. माझी बीड येथे जमीन आहे. मला तुमची मदत हवी आहे असे सांगून मदतीची याचना केली. डी.पी.सावंत यांनी त्याला काय आहे अडचण अशी विचारणा करून त्याला कांही वेळानंतर येण्यास सांगितले. त्यानंतर तो युवक तेथून गेला. पुन्हा दुपारी 4 वाजेच्यासुमारास येथे आला आणि आपल्यावरील अन्याय पुन्हा एकदा कथन करून त्या ठिकाणी हजर असलेल्या पवारला मारहाण केली. या मारहाणीत पवारचे डोके फुटले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्या ठिकाणी पोहचले. माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरात बनावट बंदुक हातात घेवून गोंधळ घालणारा युवक साहील विनोद माने यास पोलीसांनी ताब्यात घेतले. सध्या शिवाजीनगर पोलीसांनी मारहाण झालेला व्यक्ती पवार यास वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडच्या सरकारी रुग्णालय विष्णुपूरी येथे पाठवले आहे. वैद्यकीय चाचणी अहवाल आल्यावर त्या युवकाविरुध्दची इतर कायदेशीर कार्यवाही पुर्ण होणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.