गुटखा विक्रेता अफशान सौदागरला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने अवैधपणे गुटखा विकणाऱ्या युवकाला पकडल्यानंतर आज दि.1 जून 2022 रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एल.सोयंके यांनी गुटखा विक्रेत्याला 3 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने 31 मेच्या दुपारी देगलूर नाका परिसरातील आमेर फंक्शन हॉलजवळ शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विकणाऱ्या मोहम्मद मोहसीन उर्फ अफशान अब्दुल सलीम सौदागर (29) यास 1 लाख 97 हजार 163 रुपयांच्या मुद्येमालासह अटक केली. या मुद्येमालात विविध कंपन्यांचे गुटखे पाकीट, सीगारेट पॉकीट सामील आहेत. स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात मोहसिन सौदागर विरुध्द गुन्हा क्रमांक 131/2022 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार संजय केंद्रे यांच्याकडे देण्यात आला. आज दि.1 जून रोजी संजय केंद्रे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार गंगाधर कदम यांनी अफशान सौदागरला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. अफशान सौदागरच्यावतीने ऍड.इद्रीस कादरी यांनी बाजू मांडून पोलीस कोठडी देण्याची गरज नाही असा युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐकून न्या.सोयंके यांनी अफशान सौदागरला 3 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले.

अफशान सौदागरला अटक झाली. त्याच्याकडून जवळपास 2 लाख रुपयांच्या किंमती ऐवढा गुटखा आणि सिगारेट जप्त करण्यात आले.हा सर्व प्रकार पोलीसांसाठी प्रशंसनिय आहे. पण अफशान सौदागर या एका व्यक्तीशिवाय नांदेड शहरात आणि जिल्ह्यात कोणी दुसरा व्यक्ती नाही काय? जो शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करतो. स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्यावर सुध्दा अशीच कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *