संजय बियाणी हत्याकांड उघड करणाऱ्या पोलीसांनी गुन्हेगारांची रसद रोखणे आता आवश्यक

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी बियाणी हत्याकांडातील काही आरोपींना अटक केली. सध्या ते दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत. कांही जणांची तपासणी सुरू आहे. त्यांचाही निर्णय होईलच.कांही जणांना पोलीसांना पकडायचे आहे. तेही पोलीस पकडतीलच. आता या पकडलेल्या गुन्हेगारांना सोडविण्यासाठी तयार होणारी रसद पोलीसांनी थांबवणे आवश्यक आहे. नाही तर त्या रसदेच्या आधारावर आज पोलीसांनी गजाआड केलेले गुन्हेगार पुन्हा बाहेर येतील आणि ते समाजासाठी घातकच ठरतील. यासाठी पोलीसांनी जिल्हाभरातील अवैध धंदे जसे 52 पत्यांचा जुगार, मटका, गुटखा, अवैध रेती उत्खनन अशा अवैध धंद्यांना कायम बंद करण्याची गरज आहे. नाही तर आज पोलीसांनी आत पाठवलेले गुन्हेगार पुन्हा कांही दिवसांत बाहेर येतील आणि समाजासाठी विनाशकारीच असतील.
5 एप्रिल रोजी संजय बियाणी यांची हत्या झाली. पोलीसांवर अनेक आरोप झाले, बियाणी कुटूंबियांनी असहकार्य दाखवले या सर्व बाबींमुळे बियाणी हत्याकांडाच्या तपासाला तब्बल 55 दिवसांचा वेळ लागला. 55 व्या दिवशी नांदेड जिल्हा पोलीस दलाने सहा संबंधीत व्यक्तींना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठविले. पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे बियाणी यांच्या गुन्ह्यात कट होता. हे खलबत रचणाऱ्यांची पुढची तयारी पण असेल आणि त्याच तयारीसाठी लागणारा खर्चाचा पैसा गुन्हेगार अवैध मार्गांची कामे करून श्रीमंतीकडे वाटचाल करणाऱ्या लोकांकडून उकळतात आणि पोलीसांनी गजाआड टाकलेल्या लोकांना बाहेर आणण्यासाठी त्या उकळलेल्या पैशाचा उपयोग होतो.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक तथा एसआयटी प्रमुख विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी आणि त्यांच्या इतर सहकार्य पोलीस अधिकारी ज्यामध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरिक्षक ते पोलीस अंमलदार आ सर्वच पोलीसांनी घेतलेली मेहनत महत्वपूर्ण आहे. आज पोलीसांनी आम्ही सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे रक्षक आहोत हे दाखवून दिले. प्रश्न या पुढचा आहे. तो असा की, आज आपण दाखवलेली रक्षकाची स्थिती कायम ठेवण्याची जबाबदारी सुध्दा पोलीसांवर आहे. आमच्या मते त्यासाठी पोलीसांनी नांदेड जिल्ह्यात झटपट श्रीमंतीकडे येणारा कोणताही अवैध धंदा सुरू करण्यासाठी पुढाकार घेवून , परवानगी देवू नये आणि कोणी बेकायदेशीर रित्या असा अवैध व्यवसाय अर्थात धंदा चालवत असेल तर त्यास कांही-कांही वेळेच्या अंतरात पोलीसांचे 14 वे रत्न दाखवायला हवे.
समाजात अशांतता पसरविणाऱ्या गुन्हेगारांना रसद कोठून मिळते. याच्या परिक्षेपार शब्द लिहिण्याची बारी जेंव्हा येते त्यावेळी अवैध धंदे चालवणाऱ्यांकडून केली जाणारी अवैध वसुली हीच ती रसद आहे. अर्वाचिन काळापासून ईतिहासापर्यंत रसद कापण्याला खूप महत्व दिले आहे. कारण युध्द दमदारपणे चालविण्यासाठी त्या-त्या सैन्याला पुरवली जाणारी रसद खुप मोठे स्थान ठेवते. त्यातून सैनिक दमदार राहतात आणि रसद रोखली गेली तर युध्दाचा नायनाट होण्यासाठी काही वेळ लागत नाही. असेच आता या प्रकरणात पोलीसांकडून अपेक्षीत आहे की, तुम्ही आज सर्वसामान्य जनतेला दिला मिळेल, त्यांची छाती आनंदाने फुगेल असे काम केलेले आहे. पण ते काम पुढच्या भविष्यात बरेच दिवस कायम ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुध्दा पोलीसांनाच करावे लागतील आणि त्यासाठी पोलीसांनी गुन्हेगारांना रसद पुरविणाऱ्या अवैध धंद्यांना बंद करणे आवश्यक आहे. आता आम्ही एक संवेदनशिल खूनाचा गुन्हा उघडकीस आणून मोठी कामगिरी केली असा छोटासा विचार न करता आमच्या येथून बदली झाल्यानंतर सुध्दा लोकांनी आपल्या कामाची आठवण ठेवली पाहिजे असा विचार करण्याची गरज आहे.
गुन्हेगारांपर्यंत आर्थिक रसद कशी थांबवता येईल याचे एक उत्कृष्ट नियोजन पोलीसांनी करणे गरजेेचे आहे. कारण सर्वसामान्य माणूस गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविण्याचा ताकतीचा नसतो ती ताकत अवैधरितीने अत्यंत द्रुतगतीत श्रीमंतीकडे वाटचाल करणाऱ्या लोकांमध्ये असते आणि तेच त्यांना रसद पुरवितात. आम्हीच दोन महिन्यापासून बिना रसदीचे आहोत असा विचार पोलीसांनी करू नये अशी नम्र विनंती या शब्दप्रपंचातून आम्हाला करायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *