माहिती अधिकार कायद्याच्या धंद्याचा डोंगर पुन्हा नव्याने उभारणीच्या मार्गावर

नांदेड(प्रतिनिधी)-कांही महिने बंद झालेला माहिती अधिकाराचा धंदा आता पुन्हा एकदा हळूहळू सावरला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य, वर्ग-3 आणि वर्ग-4 चे शासकीय कर्मचारी यामुळे त्रासले आहेत. प्रश्न त्या संदर्भाची तक्रार देण्याचा असतो. पण ही तक्रार देणे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रकारे अवघड असते. कारण त्याच कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकारी हे प्रकरण सामोपचाराने मिटावे असा दबाव त्या कर्मचाऱ्यावर आणतात आणि माहिती अधिकाराचा धंदा करणाऱ्यांचे फावते.
मागील कांही महिने माहिती अधिकाराचा धंदा पुर्णपणे बंदच होता. त्याची अनेक कारणे आहेत. झालेही चांगले होते. अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायदा यावा यासाठी शेवटचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला आणि माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्यांनी केलेल्या कामासाठी वचक राहावी म्हणून या कायद्याचा उपयोग व्हावा असे अण्णा हजारे यांना अपेक्षीत होते. पण त्या नावाचा वापर करून अनेकांनी बोगस स्वयंसेवी संस्थांची नोंदणी केली. त्यात नाव वेगळे, काम वेगळे, नोंदणीकृत नाव एक, लेटरपॅडवर नाव दुसरे असे अनेक धंदे सुरू झाले. एखाद्या वेळी जेंव्हा आपल्यावर खुप लांबच्या पल्यात अन्याय होतो. त्याच्या परिणामात ज्वालामुखीचा उद्रेकपण होतो हा निसर्ग नियमपण आहे. असेच माहिती अधिकार धंद्यामध्ये झाले आणि या धंद्यातील मोठे नाव असणाऱ्यांवर एक पाश आवळला गेला. त्या परिणामात माहिती अधिकाराचे छोटे-मोठे धंदे करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली आणि माहिती अधिकाराचा धंदा पुर्णपणे विस्कळीत झाला. माहिती अधिकाराच्या आधारावर आम्ही असे केले, आम्ही अनेकांवर गुन्हे दाखल केले. असा आव आणूण स्वत:च स्वत:ला पदवी देवून टाकली आणि त्या पदवीच्या आधारावर आपला धंदा जोरदारपणे वाढवला होता. पण त्यांच्यावर आवळलेल्या पाशाने माहिती अधिकाराचा डोंगर झटकन कोसळला.
कोणतीही घटना झाल्यानंतर त्याची चर्चा कांही दिवस राहते आणि हळूहळू तो घटनाक्रम लोकांच्या विस्मृतीत जातो. असेच या माहिती अधिकाराचे झाले. कांही दिवस पुर्णपणे ठप्प झालेला धंदा आता पुन्हा सुरू झाला आहे. कांही विभागांमध्ये कोणतीही निविदा काढतांना त्यात माहिती अधिकाऱ्याच्या धंद्यात गुंतवणूक करायची आहे. हे गृहीत धरले जाते आणि त्यानुसारच ते काम सुरू केले जाते आणि पुर्णत्वाकडे मार्गक्रम केले जाते. माहिती अधिकाराच्या धंद्याला फाटा देवून कोणतेही काम होवू शकत नाही अशी एक प्रथा रुढ होत चालली आहे. माहिती अधिकार धंद्याचा डोंगर कोसळल्यानंतर त्याची उभारी आता सुरु झाली आहे. वर्ग-3 आणि वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्याविरुध्द माहिती अधिकाराचे अर्ज येणे सुरू झाले आहे. पुर्वी वर्ग-1 आणि वर्ग-2 यांच्याविरुध्दही असे अर्ज येत होते. पण आता सुरुवात पुन्हा एकदा करावी लागल्याने माहिती अधिकाराचे अर्ज वर्ग-3 आणि वर्ग-4 यांच्याविरुध्द देण्याची सुरूवात झाली आहे.
माहिती अधिकाराचा धंदा करणाऱ्यांमुळे कोणाला काही त्रास असेल, कोणी खंडणी मागितली असेल किंवा इतर कांही प्रकार घडत असेल तर कांही महिन्यापुर्वी पोलीसांनी त्याबद्दल जनतेला जाहीर आवाहन केलेले आहे. आजही ते आवाहन कायम आहे. माहिती अधिकाराचा बडगा दाखवून कोणाची लुट होत असेल तर त्या सर्वांनी पोलीसांचे दार ठोठावणे आवश्यकच आहे. कारण मागचा माहिती अधिकार धंद्याचा डोंगर फोडण्यात महत्वाचा वाटा पोलीसांचाच आहे. आणि पुढेही तेच हे काम करु शकतात. तेंव्हा न लाजता पोलीसांनाकडे जा आणि नव्याने उभारला जाणारा माहिती अधिकाराचा धंदा फोडून काढा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *