नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल सोडून वागत आहेत. याबद्दल मला काय दखल घ्यायची ती मी घेईल पण शासकीय अधिकाऱ्यांनी आपण कोणाच्या घरचे नोकर आहोत असे वागू नये असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
केंद्र सरकारमधील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आज 8 वर्ष पुर्ण केल्याच्या पार्श्र्वभूमीवर बोलवलेल्या पत्रकार परिषदेत खा.चिखलीकर बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, शहराध्यक्ष किशोर देशमुख यांची उपस्थिती होती. सुरूवातीला मोदी सरकारच्या काळात गरीब कल्याण कार्यक्रमान्वये शोषित आणि वंचितांना संरक्षण मिळाले हे सांगतांना कोरोना काळात 80 कोटी जनतेला मोफत अन्न-धान्य, 9 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, 3 कोटीहुन अधिक लोकांना मालकीची घरे, 41 कोटी पेक्षा जास्त लोकांना जनधन खाती असे अनंत कार्यक्रम प्रभावीपणे राबवून शोषीत, वंचित वर्गाला संरक्षण दिले असे खा.चिखलीकर यांनी सांगितले. सबका साथ सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्र्वास हा मंत्र घेवून मोदी शासनाने 8 वर्षाच्या कालखंडात अंत्योदय आणि एकात्म मानव वादाला केंद्रस्थानी ठेवून गोर-गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशातील सुरक्षा मजबुत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देणे, असे कणखर धोरण ठेवल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली. आज जगात भारताकडे आदरानेच पाहिले जात आहे हे नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच शक्य झाले असे खा.पाटील म्हणाले.
2014 मध्ये मोदी सरकार सत्येवर आल्यानंतर जम्मू काश्मिरमधील 370 कलम रद्द करणे, राम मंदिराच्या उभारणीतील अडथळे दुर करणे, तिहेरी तलाक पध्दत रद्द करणे, नागरीकत्व सुधारणा कायदा मंजुर करणे यासारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षापासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले. कायम अशांत असणाऱ्या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. यासोबत अनेक योजना राबवल्या. कोरोना संकट काळातील मोदी सरकारचे सुशासन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. योग्य वेळी टाळेबंदीचा निर्णय घेवून अवघ्या 9 महिन्यात दोन स्वदेशी लस विकसीत केल्या आणि लसीकरणाचे आवाहन यशस्वीपणे पेलले. भारत सरकारने अनेक विकसीत राष्ट्रांना कोरोना लढाईत मागे टाकले. आज भारताची अर्थ व्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थ व्यवस्था झाली आहे असे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या विषयावर बोलतांना खा. चिखलीकर म्हणाले, नांदेड जिल्ह्यात प्रोटोकॉल हा विषय पाळला जात नाही. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण झाल्यावर मी एकाही जिल्हा नियोजन बैठकीत गेलो नाही. प्रोटोकॉल सोडून वागणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपण कोणाच्या घरचे नोकर नाहीत याची जाणीव ठेवावी असे सांगितले. राज्य सरकार हप्ते वसुलीत दंग आहे. त्यापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भाने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना खा.चिखलीकर म्हणाले ते बरगळतात. त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही. नांदेड जिल्ह्यात गाजलेल्या संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात मोठ-मोठ्या घोषणा करणाऱ्या खा.चिखलीकरांना त्याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, मी आजही संजय बियाणी हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे देण्यावर ठाम आहे. पोलीसांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या संजय बियाणी हत्याकांडाचा गुन्हा उघड केल्याच्या बाबतीत बोलतांना मला अद्याप त्याबद्दल संपुर्ण माहिती नाही म्हणून मी काही बोलणार नाही.
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपण कोणाच्या घरचे नोकर आहोत असे वागू नये-खा.चिखलीकर