नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन मुस्कान-11 या शोध मोहिमेदरम्यान पोलीस विभागाने सहा महिन्याच्या एका बालकास घेवून संशयास्पद रित्या फिरणारी एक महिला पाहुन तिची विचारपुस केली. त्या महिलेला तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आले.
ऑपरेशन मुस्कान-11 या शोध मोेहिमेअंतर्गत 2 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतुक कक्षातील पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, मारोती माने, शितल सोळंके हे पथक रेल्वे स्थानक परिसरात फिरत असतांना त्यांना एक महिला दिसली. त्या महिलेकडे सहा महिन्यांचे एक बालक होते. तेंव्हा पोलीस पथकाने त्या महिलेकडे विचारणा केली असता मी माधुरी आहे, हिंगोली जिल्ह्यातून बाळ आजारी असल्याने दवाखान्यात दाखवायला आलो होतो. माझा नवरा रेल्वे तिकिट आणण्यासाठी गेला आहे असे सांगितले. पोलीस पथक तेथेच थांबले. पण बराच वेळ तिचा नवरा आलच नाही. तेंव्हा पुन्हा पोलीसांनी मायेचा हात ठेवत तिला बोलते केले. तेंव्हा तीने सांगितले माझे नाव माधुरी सुरेश हातवळणे असे आहे. मी शांतीनगर इतवारा भागात राहते. माझा नवरा दारु पिऊन त्रास देत असल्यामुळे मी बाळाला घेवून कोठे तरी निघून जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आली आहे. तेंव्हा मात्र पोलीसांना सत्यता ऐकून शहारे आले. पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव त्यांच्या सहकारी अंमलदारांनी त्या महिलेला बालकासह जमेल त्याप्रमाणे तीची सोय केली आणि तिला सोबत घेवून इतवारा पोलीस ठाणे गाठले. या नंतर इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी त्वरीत प्रभावाने त्या महिलेच्या पतीला बोलावले आणि महिला आणि बालक त्याचे ताब्या दिले. पोलीस विभागाने ही माहिती प्रसारीत करतांना जनतेला आवाहन केले आहे की, बेवारस, संशयस्पदरित्या अशा परिस्थिती बालक आणि बालके दिसून आल्यास जनतेने तो प्रकार पोलीस विभागाला कळवावा आणि बालक-बालिकांना चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून रोखण्यासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेला प्रतिसाद द्यावा.
..जेंव्हा पोलीसांच्या अंगावर शहारे येतात !