नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना अखेर नियंत्रण कक्षात जमा व्हावेच लागले. त्यांच्या जागी गुरूद्वारा सुरक्षा पथकात कार्यरत पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांना सध्या नियुक्ती देण्यात आली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शिवाजीराव पाटील यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर नियमाप्रमाणे श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना पोलीस नियंत्रण कक्षात जमा करणे आवश्यक होते. पण तसे न होता घोरबांड यांना पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे सुट्टीवर असल्या कारणाने पोलीस मुख्यालयाचा प्रभारी करण्यात आले. काल दि.10 जून रोजी विजय धोंडगे सुट्पटीवरुन परत आले त्यामुळे मागील चार दिवसापासून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रिकाम्या खुर्चीवर कोण बसणार याची चर्चा सुरू झाली. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड ग्रामीणच्या रिकाम्या खुर्चीवर सध्या तरी दिपक बोरसे यांची नियुक्ती केली आहे. मागील दीड वर्षापासून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवर पुर्णविराम लावण्याची प्राथमिक जबाबदारी दिपक बोरसे यांच्यावर आहे. कोणाच्या नियंत्रणात काय द्यावे, कोण कोणते काम करील यावर त्यांना बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तरच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा कार्यभार पुन्हा पुर्व पदावर येईल. अशा प्रकारे मागील दीड वर्षापासून तोंडी आदेशावर कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना तोंडी आदेशानेच नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे.